१
नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ।। १।।
गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आपुल्या स्तुतीला द्यावी मती ।। २।।
गुरुराया तुज ऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ।। ३।।
तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ।। ४।।
२
पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी । तया सुखा सरी नाहीं दुजें ।। १।।
केशव वामन नारायण विष्णु । कृष्ण संकर्षणु राम राम ।। २।।
माधवा वामना श्रीधरा गोविंदा । अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा ।। ३।।
नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा । हृषीकेशा पावा स्मरणमात्रें ।। ४।।
तुका म्हणे एका नामीं भाव । राहे होय साह्य पांडुरंग ।। ५।।
३
अयोध्या मथुरा काशी अवंतिका । कांची हे द्वारका माया सत्य ।। १।।
मोक्ष पुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे । प्राणी तो उद्धरे स्मरणमात्रें ।। २।।
नित्य नित्य मनीं हरि आठवावा । तेणेंचि तरावा भवसिंधु ।। ३।।
तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा । राहील जो नेमा तोचि धन्य ।। ४।।
४
यमुना कावेरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ।। १।।
नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे । नाहीं भय साचें प्राणियासी ।। २।।
जयाचे संगती प्राणी उद्धरती । दर्शनेंच होती मुक्ति प्राप्त ।। ३।।
तुका म्हणे नामीं एकनिष्ठ भाव । तेथें वासुदेव सर्व काळ ।। ४।।
५
प्रातःकाळीं नाम पवित्रचि घ्यावें । तेणें विसरावें जन्ममृत्यु ।। १।।
नळ युधिष्ठिर जनक जनार्दन । स्मरणेंचि धन्य होती प्राणी ।। २।।
न करा आळस नाम घेतां वाचे । नाहीं भय साचें प्राणियांसी ।। ३।।
तुका म्हणे वाचें गाईल गोविंद । होईल परमानन्द नामें एका ।। ४।।
६
कश्यप गौतम भारद्वाज अत्री । ऋषि विश्वामित्र नाम थोर ।। १।।
जमदग्नि मुनि वसिष्ठ वर्णिला । तिन्हीं लोकीं झाला वंद्य एक ।। २।।
नाम घेतां नुरे पाप ताप दैन्य । होय थोर पुण्य उच्चारितां ।। ३।।
तुका म्हणे ऐसी उच्चारितां वाणी । तेथें अंतःकरणीं सुख होय ।। ४।।
७
अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी । मुख्य मंदोदरी पतिव्रता ।। १।।
नामें घेतां त्यांची वाणी हे पवित्र । होय कुळगोत्र उद्धरण ।। २।।
संकल्प विकल्प सांडोनियां दुरी । वाचे हरि हरी उच्चारावे ।। ३।।
नाहीं बद्धकता तया संसाराची । जाचणी यमाची मग कैंची ।। ४।।
८
व्यास अंबरीष वसिष्ठ नारद । शौनक प्रल्हाद भागवत ।। १।।
नित्य स्मरण करी यांचें जरी प्राणी । पुन्हां नाहीं खाणी चौंऱ्याशींची ।। २।।
शुक पराशर मुनि पुंडलीक । अर्जुन वाल्मीक नाम गाती ।। ३।।
बली बिभीषण भीष्म रुक्मांगद । बकदाल्भ्य शुद्ध महाऋषि ।। ४।।
तुका म्हणे यांचीं नामें येतां वाणीं । प्रत्यक्ष तो प्राणी देवाऐसा ।। ५।।
९
गीता भागवत वेद उच्चारितां । पापाची तों वार्ता कोठें राहे ।। १।।
सकळ वासना नामीं जे रंगली । साधनें राहिली मग कैंची ।। २।।
म्हणोनिया नेम ऐसा तारी जीवा । होय तोचि देवा आवडता ।। ३।।
उगवला दिवस जाय तो क्षणांत । विचारूनि हित वेगीं करा ।। ४।।
तुका म्हणे स्मरा वेगीं विठोबासी । न धरा मानसीं दुजें कांहीं ।। ५।।
१०
तीर्थांचें जें मूळ व्रतांचें जें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरीये ।। १।।
तें आम्हीं देखिलें आपुले नयनीं । फिटलीं पारणीं लोचनांचीं ।। २।।
जिवींचा जिव्हाळा सुखाचा शेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ।। ३।।
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभपर दुष्टां काळ ।। ४।।
सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ।। ५।।
तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीतीं गातां ।। ६।।
११
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ।। १।।
कस्तुरी मळकट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ।। २।।
मुकुट कुंडलें श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतिलें सकळही ।। ३।।
कांसे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ।। ४।।
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ।। ५।।
१२
आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ।। १।।
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ।। २।।
लांचावलें मन लागलीसे गोडी । ते जीवें न सोडी ऐसें झालें ।। ३।।
तुका म्हणे आम्हीं मागावें लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ।। ४।।
१३
शंख चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती दोन्हीं कानीं ।। १।।
मस्तकीं मुकुट नवरत्नहार । वरी पीतांबर पांघुरला ।। २।।
रत्नहिरेजडित कटीं कडदोरा । रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ।। ३।।
जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका । लाचावला तुका भेटीसाठीं ।। ४।।
१४
नेणें जप तप योग युक्ति ध्यान । करितां चिंतन रात्रंदिवस ।। १।।
नेणें कांहीं देवा झालों उतराई । मागें लागों पाहीं बाळ जैसा ।। २।।
भाव-गंगोदकें आम्ही शुद्ध पाहें । प्रक्षाळिले पाय विटेसहित ।। ३।।
जन्मली जान्हवी ज्या ठायीं उत्तम । हारावया श्रम भाविकांचे ।। ४।।
तुका म्हणे आम्ही झालों पुण्यवंत । सेविलें अमृत रामतीर्थ ।। ५।।
१५
परिमळमिश्रित करूनि उटणें । नारायण तेणें तोषविला ।। १।।
पय घृत दहि मधु ते शर्करा । गोशृंगधारा अखंडित ।। २।।
करोनि संयुक्त ओपियली ईशा । पंचामृतें तैशी पंचविधि ।। ३।।
तुका म्हणे जेथें गंगे जन्म झाला । प्रसाद दिधला आम्हालागी ।। ४।।
१६
आपुलिया घरीं कष्ट तरी करीं । आणोनि घागरी गंगोदक ।। १।।
करोनि विनंती विनवितो तुम्हां । स्नान पुरुषोत्तमा करा वेगीं ।। २।।
उत्तम वस्त्रानें पुसावें तें अंग । करोनि अभ्यंग सर्वांगासी ।। ३।।
परिधान वस्त्रें केलें पीतांबरें । तेणें हें साजिरें रूप दिसे ।। ४।।
तुका म्हणे नेत्र पाहतां निवाले । ध्यान संचारलें हृदयामाजीं ।। ५।।
१७
मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा । पुनरपि संसारा येणें नाहीं ।। १।।
मन हें सेवंती अर्पूनी भगवंतीं । पुनरपि संसृती येणें नाहीं ।। २।।
मन हें तुळसी अर्पूनी हृषीकशी । पुनरपि जन्मासी येणे नाहीं ।। ३।।
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तया वास व्हावा वैकुंठासी ।। ४।।
१८
नामपुष्प शुद्ध गळां घाला हार । विवेक सारासार तुरा लावूं ।। १।।
बोध भाळीं बुका क्षमा तुलसीदळ । वाहतां गोपाळ संतोषतो ।। २।।
गाइलीया गुण संतोषें तयानें । करितां कीर्तनें आल्हादे तो ।। ३।।
आल्हादे हा देव कीर्ति वाखाणितां । पवाडे सांगतां याचे यास ।। ४।।
याचे यास करूं सर्व निवेदन । वारील हा शीण संसारींचा ।। ५।।
संसाराचा वारा लागों नेदी अंगा । भावे पांडुरंगा आळवितो ।। ५।।
तुका म्हणे आतां उजळली आरती । भावें तो श्रीपती ओंवाळूंया ।। ७।।
१९
शब्दाचिया भावें केला उपचार । तेणें सर्वेश्वर संतोषला ।। १।।
शब्दाचिया करें करविलें भोजन । धाला नारायण तेणें सुखें ।। २।।
शब्दाचिया करें करविले आचमन । तांबूल अर्पून फळें पुष्पें ।। ३।।
तुका म्हणे अन्नाआधी धूपदीप । उपचार अल्प समर्पिले ।। ४।।
२०
मजलागीं नाहीं ज्ञानाची ती चाड । वाचे घेत गोड नाम तुझें ।। १।।
नेणतें लेकरुं आवडीचें नातें । बोले वचनातें आवडीनें ।। २।।
भक्तिविण कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ।। ३।।
तुका म्हणे नाचूं निर्लज्ज होउनी । नाहीं मझे मनीं दुजा भाव ।। ४।।
२१
पूजूं नारायण शब्दाचे सुमनें । मंत्रपुष्प तेणें वाहियेलें ।। १।।
भावाचे पैं हातीं जोडुनी ओंजळ । समर्पिलें जळ शुद्ध भावें ।। २।।
मुखशुद्धी तांबूल दिलें तुळसीदल । आनंद सकळ ओसंडला ।। ३।।
तुका म्हणे आतां उरलें नाहीं । नामाविण कांहीं बोलावया ।। ४।।
२२
समाधान चित्ताचें चरणा आलिंगन । पायावरी मन स्थिरावलें ।। १।।
जैसें केलें तैसें घालूं लोटांगणा । करूं प्रदक्षिणा नमस्कार ।। २।।
प्रार्थितों मी तुज राहें माझें पोटीं । हृदयसंपुटीं देवराया ।। ३।।
क्षेम आलिंगन दिली पयीं मिठी । घेतलीसे लुटी अमूप हो ।। ४।।
तुका म्हणे आतां आनंदीआनंद । गाऊं परमानंद मनासंगें ।। ५।।
२३
काय उपचार करूं पांडुरंगा । हेंचि मज सांगा विचारूनी ।। १।।
कोणता पदार्थ उणा तुजपासी । बोलाया वाचेशीं मौन पडे ।। २।।
शंकर\-शेषादि करिती स्मरण । तेथें माझें मन गाऊं शके ।। ३।।
इंद्र सुरवर वाहती सुमनें । तेथें म्यां वाहणे काय एक ।। ४।।
परीं आवडीनें जोडूनी ओंजळ । बुका वाहूं माळ तुळसीची ।। ५।।
उणें पुरें तुम्ही करूनियां सांगा । जिवालागीं मग सुख तेव्हां ।। ६।।
तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना । तुम्ही नारायणा सेवकाची ।। ७।।
२४
कैसें करूं ध्यान कैसा पाहूं तुज । वर्म दावी मज याचकासी ।। १।।
कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ।। २।।
कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षीं जाणूं । जाणुं हा कवणूं कैसा तुज ।। ३।।
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिति मति न कळे मज ।। ४।।
तुका म्हणे जैसें दास केलें देवा । तैसें हें अनुभवा आणीं मज ।। ५।।
२५
काय तुज कैसें जाणावें गा देवा । आणावे अनुभवा कैशापरी ।। १।।
सगुण निर्गुण स्थूल कीं लहान । न कळे अनुमान मज तुझें ।। २।।
कोणता निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तारावया ।। ३।।
तुका म्हणे कैसें पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ।। ४।।
२६
स्तुती करूं तरी कोण माझी मती । वेदां पडे भ्रांति हें आश्चर्य ।। १।।
परी हा जिव्हाग्रीं रामकृष्णहरी । बैसवीं लौकरी यातीगुण ।। २।।
रूप गुण कीर्ति कृपाळू उदार । वर्णावया पार ब्रह्मअ नेणे ।। ३।।
रूपीं नामीं शिव होऊनिया वेडा । वर्णिला पवाडा रामनामीं ।। ४।।
तुका म्हणे मज नेणवेचि शिव । नाहीं राहिला वाव बोलावया ।। ५।।
२७
नामाचा प्रताप न वर्णवेचि मज । सांग गरुडध्वज राहे तेथें ।। १।।
मम वाचा किती परतल्या श्रुती । वेद मुखें श्रुती मौन ठेले ।। २।।
वर्णूं नेणें शेष नामाचा पवडा । चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या ।। ३।।
अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी । पायांची किंकरी होऊनि ठेली ।। ४।।
तुका म्हणे आम्ही मानव किंकर । वर्णावया पार न कळे तुझा ।। ५।।
२८
आम्हीं मानवानी वर्णावें तें काय । सुरवर पाय वंदिताती ।। १।।
गणेश शारदा करिती गायन । आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ ।। २।।
जयाच्या गायना तिष्ठतो शंकर । तयासी पैं पार न कळे तुझा ।। ३।।
तुका म्हणे आम्ही किंकर ते किती । इंद्राची ती मती नागविली ।। ४।।
२९
अगा महाविष्णु अनंत भुजांच्या । आम्हां अनाथांच्या सोयरीया ।। १।।
न कळे महिमा वेद मौनावती । तेथें माझी मति कोणीकडे ।। २।।
काय म्यां वर्णावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना शक्ति नव्हे ।। ३।।
रविशशी जेथें तेजें सामावती । तेथें माझी मती कोणीकडे ।। ४।।
तुका म्हणे आम्ही बाळ तूं माऊली । करावी साउली करुणेची ।। ५।।
३०
नमो विश्वरूपा अगा मायबाप । अपारा अमूपा पांडुरंगा ।। १।।
विनवितो रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावे ।। २।।
तुझी स्तुती वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ।। ३।।
ऋशि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ।। ४।।
तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ति देवा ।। ५।।
३१
विनविजे ऐसे भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ।। १।।
धीटपणे पत्र लिहिलें आवडी । पार नेणें थोडी मति माझी ।। २।।
जेथें वेदां तुझा न कळेचि पार । तेथें मी अपार काय वानूं ।। ३।।
जैसे तैसे माझे बोल अंगिकारी । बोबड्या उत्तरी गौरवितो ।। ४।।
तुका म्हणे विटेवरी जीं पाऊलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ।। ५।।
३२
त्रिगुण आटीव वाचेचा पसारा । पडेल विचार सर्व रस ।। १।।
आदि मध्य अंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळुनी गेलें ।। २।।
रामकृष्ण नाम माळ ही साजिरी । ओंविली गोजिरी कर्णीं मनी ।। ३।।
तुका म्हणे तनु झाली हे शीतल । आवडी सकळ ब्रह्मानंदें ।। ४।।
३३
इतुकें करीं देवा ऐकें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ।। १।।
इतुकें करीं देवा आइकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ।। २।।
इतुकें करीं देवा विनवितों तुज । संतचरण रज वंदी माथां ।। ३।।
इतुकें करी देवा आइकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ।। ४।।
भलतियां भावें तारी पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ।। ५।।
।। इति श्रीतुकाराम हरिपाठ समाप्त ।।