हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं ।
अखंड श्रीपती नाम वाचे ।। १।।
रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती ।
नित्य नामें तृप्ती जाली आम्हां ।। २।।
नामाचेनि स्मरणें नित्य पैं सुखांत ।
दुजीयाची मात नेणो आम्ही ।। ३।।
निवृत्ति जपतु अखंड नामावळी ।
हृदयकमळीं केशीराज ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २

हरिविण चित्तीं न धरीं विपरीत ।
तरताती पतित रामनामें ।। १।।
विचारुनी पाहा ग्रंथ हे अवघे ।
जेथें तेथें सांग रामनाम ।। २।।
व्यासादिक भले रामनामापाठीं ।
नित्यता वैकुंठीं तयां घर ।। ३।।
शुकादिक मुनि विरक्त संसारीं ।
रामनाम निर्धारीं उच्चारिलें ।। ४।।
चोरटा वाल्मीकि रामनामीं रत ।
तोही एक तरत रामनामीं ।। ५।।
निवृत्ति साचार रामनामी दृढ ।
वघेचि गूढ उगविले ।। ६।।


हरिमार्ग सार येणेंचि तरिजे ।
येरवीं उभिजे संसार रथ ।। १।।
जपतां श्रीहरी मोक्ष नांदे नित्य ।
तरेल पैं सत्य हरि नामें ।। २।।
काय हें ओखद नामनामामृत ।
हरिनामें तृप्त करी राया ।। ३।।
निवृत्ति साचार हरिनाम जपत ।
नित्य हृदयांत हरी हरी ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

एकेविण दुजें नाहीं पैं ये सृष्टी ।
हें ध्यान किरीटी दिधलें हरी ।। १।।
नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला ।
द्वैताचा अबोला तया घरीं ।। २।।
हरीविणें देवो नाहीं नाहीं जनीं ।
अखंड पर्वणी हरी जपतां ।। ३।।
निवृत्ति साकार हरिनाम पाठ ।
नित्यता वैकुंठ हरिपाठ ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

जपतां कुंटिणी उतरे विमान ।
नाम नारायण आलें मुखा ।। १।।
नारायण नाम तारक तें आम्हां ।
नेणों पैं महिमा अन्य तत्त्वीं ।। २।।
तरिले पतित नारायण नामें ।
उद्धरिले प्रेमें हरिभक्त ।। ३।।
निवृत्ति उच्चार नारायण नाम ।
दिननिशी प्रेम हरी हरी ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

एक तत्त्व हरि असे पैं सर्वत्र ।
ऐसें सर्वत्र शास्त्र बोलियलें ।। १।।
हरिनामें उद्धरे हरिनामें उद्धरें ।
वेगीं हरि त्वरें उच्चारी जो ।। २।।
जपता पैं नाम यमकाळ कांपे ।
हरी हरी सोपें जपिजे सुखें ।। ३।।
निवृत्ति म्हणे हरिनामपाठ जपा ।
जन्मांतर खेपा अंतरती ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

गगनींचा घन जातो पैं वारेन ।
अवचिता पतन अधोपंथें ।। १।।
अध ऊर्ध्व हरि भाविला दुसरी ।
प्रपंचबोहरी आपोआप ।। २।।
निवृत्ति म्हणे जन हरीचें स्वरूप ।
कळाचें पैं माप हरिनाम ।। ३।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

सृष्टीच्या संमता सुरतरु तरु ।
बोलिला विस्तारु धर्मशास्त्रीं ।। १।।
नेघों हें तरु प्रपंचपरिवारु ।
प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा ।। २।।
निवृत्ति निवांत हरीच सेवित ।
दो अक्षरीं उचित इंद्रिया ।। ३।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ –

सर्वांभूतीं दया शांती पैं निर्धार ।
योग साचार जनीं इये ।। १।।
न लगे मुंडण काया हें दंडणें ।
अखंड कीर्तन स्मरे हरी ।। २।।
शिव जाणें जीवीं रक्षला चैतन्य ।
हे जीवीं कारुण्य सदा भावीं ।। ३।।
गगनीं सूर्य तपे अनंत तारा लोपे ।
एकची स्वरूपें आत्मा तैसा ।। ४।।
उगवला कळीं उल्हासु कमळीं ।
तैसा तो मंडली चंद्र लेखा ।। ५।।
निवृत्तिमंडळ अमृत सकळ ।
घेतलें रसाळ हरिनाम ।। ६।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १०

जयाचेनि सुखें चळत पैं विश्व ।
नांदे जगदीश सर्वा घटीं ।। १।।
त्याचें नाम हरी त्याचें नाम हरी ।
प्रपंचबोहरी कल्पनेची ।। २।।
शांति त्याची नारी प्रकृति विकारी ।
उन्मनी बोवरी हृदयांतु ।। ३।।
निवृत्तिदेवीं साधिली राणीव ।
हरपले भाव इंद्रियांचे ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – ११

हरीविण भावो वायांचि संदेहो ।
हरि देवो देवो आहे सत्य ।। १।।
हरी हरी वाचे ऐसें जपा साचें ।
नाहीं त्या यमाचे मोहजाळ ।। २।।
हरीविण सार नाहीं पैं निर्धार ।
हरिविण पार न पाविजे ।। ३।।
निवृत्ति श्रीहरि चिंती निरंतरीं ।
हरि एक अंतरीं सर्वीं नांदे ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १२

ध्यान धरा हरी विश्रांति नामाची ।
विठ्ठलींच साची मनोवृत्ति ।। १।।
ध्यानेविण मन विश्रांतिविण स्थान ।
सूर्याविण गगन शून्य दिसे ।। २।।
नलगे साकार विठ्ठल मनोवृत्ति ।
प्रपंच समाप्ति ती अक्षरीं ।। ३।।
निवृत्ति समता विठ्ठल कीर्तन ।
करितां अनुदीन मन मेळे ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १३

प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज ।
आम्हां बोलता लाज येत सये ।। १।।
काय करूं हरी कैसां हा गवसे ।
चंद्रसूर्य अंवसे एकसूत्र ।। २।।
तैसें करूं मन निरंतर ध्यान ।
उन्मनी साधन आम्हां पुरे ।। ३।।
निवृत्ति हरिपाठ नाम हेंचि वाट ।
प्रपंच फुकट दिसे आम्हां ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १४

लटिका संसार वाढविसी व्यर्थ ।
विषयाचा स्वार्थ क्षणें करीं ।। १।।
नको शिणों दुःखे का भरिसी शोकें ।
एकतत्त्वें एकें मन लावीं ।। २।।
लावीं उन्मनीं टाळी टाळिसी नेई बाळी ।
अखंड वनमाळी हृदयवटी ।। ३।।
निवृत्ति चपळ राहिला अचळ ।
नाहीं काळ वेळ भजतां हरी ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १५

कल्पना काजळी कल्पिले कवळी ।
कैसेनि जवळीं देव होय ।। १।।
टाकी हे कल्पना दुरित वासना ।
अद्वैत नारायणा भजें कां रे ।। २।।
मोहाच्या जीवनीं नको करूं पर्वणी ।
चिंती कां आसनीं नारायण ।। ३।।
निवृत्ति अवसरु कृष्णनाम पैं सारु ।
कल्पना साचारु हरी झाला ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १६

मोहाचेनि देठें मोहपाश गिळी ।
कैसेनि गोपाळीं सरता होय ।। १।।
मोहाचेनि मोहनें चिंतितां श्रीहरी ।
वाहिजु भीतरीं अवघा होय ।। २।।
दिननिशीं नाम जपतां श्रीहरीचें ।
मग या मोहाचें मोहन नाहीं ।। ३।।
निवृत्ति आगम मोहन साधन ।
सर्व नारायण एका तत्त्वें ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १७

तिमिरपडळें प्रपंच हा भासे ।
झाकोळला दिसे आत्मनाथ ।। १।।
हरीविण दुजें चिंतितां निभ्रांत ।
अवघेंचि दिसत माया भ्रम ।। २।।
सांडूनि तिमिर सर्व नारायण ।
हेंचि पारायण नित्य करी ।। ३।।
निवृत्ति सज्जन अवघा आत्मराज ।
एकतत्त्व बीज नाम लाहो ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १८

प्रवृत्ति निवृत्ति या दोन्ही जनीं ।
वनीं काज करुनी असती ।। १।।
नारायण नाम जपतांचि दोन्ही ।
एकतत्त्वीं करणी सांगिजे गुज ।। २।।
आशेचे विलास गुंफोनिया महिमा ।
सत्त्वीं तत्त्व सीमा निजज्ञाने ।। ३।।
निवृत्ति तत्त्वतां मनाचे मोहन ।
नित्य समाधानें रामनामें ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – १९

क्षेत्राचा विस्तार क्षेत्रज्ञवृत्ति ।
अवघी हे क्षिती एकरूपें ।। १।।
शांति दया पैसे क्षमा जया रूप ।
अवघेची स्वरूप आत्माराम ।। २।।
निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा ।
सांडूनियां भजा केशवासी ।। ३।।
निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्त ।
अवघींच समस्त गिळियेलीं ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २०

आम्ही चकोर हरि चंद्रमा ।
आम्ही कळा तो पौर्णिमा ।। १।।
कैसा बाहिजु भीतरी हरी ।
बिंब बिंबला एक सूत्रीं ।। २।।
आम्ही देही तो आत्मा ।
आम्ही विदेही तो परमात्मा ।। ३।।
ऐक्यपणें सकळ वसे ।
द्वैतबुद्धी कांहीं न दिसे ।। ४।।
निवृत्ति चातक इच्छिताहे ।
हरिलागीं बरें तें पाहे ।। ५।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २१

ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता ।
तोचि एक पुरता घटु जाणा ।। १।।
नामचेनि बळे कळिकाळ आपणा ।
ब्रह्मांडा येसणा तोचि होय ।। २।।
न पाहे तयाकडे काळ अवचिता ।
नामाची सरिता जया मुखीं ।। ३।।
निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामे ।
नित्य परब्रह्म त्याचे घरीं ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २२

नित्य नाम वाचे तोचि एक धन्य ।
त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ।। १।।
रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे ।
दहन पापाचें एका नामें ।। २।।
ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम ।
नाहीं तयासम दुजें कोणी ।। ३।।
निवृत्ति अव्यक्त रामनाम जपे ।
नित्यता पैं सोपें रामनाम ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २३

अखंड जपतां रामनाम वाचे ।
त्याहूनी दैवाचे कोण भूमी ।। १।।
अमृतीं राहिले कैचें मरण ।
नित्यता शरण हरिचरणा ।। २।।
नाममंत्र रासी अनंत पुण्य त्यासी ।
नाहीं पैं भाग्यासी पार त्याच्या ।। ३।।
निवृत्ति म्हणे सार रामनाम मंत्र ।
कैंचा त्यासी शत्रु जिती जनीं ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २४

नाम नाहीं वाचे तो नर निर्दैव ।
कैसेनि देव पावेल तया ।। १।।
जपे नाम वाचें रामनाम पाठें ।
जाशील वैकुंठे हरी म्हणता ।। २।।
न पाहे पैं दृष्टीं कळिकाळ तुज ।
रामनाम बीज मंत्रसार ।। ३।।
निवृत्ति म्हणे नाम जपावें नित्यता ।
आपणचि तत्त्वतां होईल हरी ।। ४।।


संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २५

नामाचेनि बळें तारिजे संसार ।
आणिक विचार करूं नको ।। १।।
नाम जप वेगीं म्हणे हरी हरी ।
प्रपंच बोहरी आपोआप ।। २।।
नित्यता भजन देवद्विज करी ।
नाम हे उcचारि रामराम ।। ३।।
निवृत्ति जपतु राम राम वाचे ।
दहन पापाचें आपोआप ।। ४।।