वाकीभ लोगो

नामाचा महिमा कोण करी सीमा ।
जपावें श्रीरामा एका भावें ।। १।।
न लगती स्तोत्रें नाना मंत्रें यंत्रें ।
वर्णिजे बा वक्त्रें श्रीरामनाम ।। २।।
अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी ।
तरीच मुखासी नाम येत ।। ३।।
नामा म्हणें नाम महाजप परम ।
तो देह उत्तम मृत्युलोकीं ।। ४।।


संत नामदेव हरिपाठ – २

जन्माचें कारण रामनामपाठीं ।
जाइजे वैकुंठीं एकीहेळा ।। १।।
रामनाम ऐसा जिव्हे उमटे ठसा ।
तो उद्धरेल आपैसा इहलोकीं ।। २।।
दो अक्षरीं राम जप हा परम ।
नलगे तुज नेम नाना पंथ ।। ३।।
नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र ।
उद्धरिते गोत्र पूर्वजेंसी ।। ४।।


संत नामदेव हरिपाठ – ३

विषयांचे कोड कां करिसी गोड ।
होईल तुज जोड इंद्रियबाधा ।। १।।
सर्वही लटिकें जाण तूं बा निकें ।
रामाविण एकें न सुटिजे ।। २।।
मायाजाळ मोहें इंद्रियांचा रोहो ।
परि न धरेचि भावो भजनपंथें ।। ३।।
नामा म्हणे देवा करीं तूं लावलाही ।
मयूराचा टाहो घनगर्जना ।। ४।।


संत नामदेव हरिपाठ – ४

कांसवीचे दृष्टी जैं येईज्ए भेटी ।
तैं अमृताची सृष्टी घडे त्यासी ।। १।।
तैसें हें भजन श्रीरामाचें ध्यान ।
वाचे नारायण अमृतमय ।। २।।
धन्य त्याचें कुळ सदा पैं सुफळ ।
दिननिशीं पळ रामनाम ।। ३।।
नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम ।
वाचेसी सुगम रामनाम ।। ४।।


संत नामदेव हरिपाठ – ५

सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ ।
वंदी कळिकाळ शास्त्र सांगे ।। १।।
ब्रह्मांडनायक ऐसें जें कौतुक ।
तेंचि नाम एक श्रीकृष्ण ऐसें ।। २।।
आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा ।
परिपूर्ण सरिता अमृताची ।। ३।।
नामा म्हणे अनंत कां करिशी संकेत ।
उद्धरिले पतित युगायुगीं ।। ४।।


गोविंद गोपाळ वाचेसी निखळ ।
तो उद्धरे तात्काळ कलीमाजी ।। १।।
नारायण नारायण हेंचि पारायण ।
उद्धरले जन इहलोकीं ।। २।।
तुटती यातना कर्माच्या भावना ।
जडजीवउद्धारणा नाम स्मरा ।। ३।।
नामा म्हणे राम हा जप परम ।
न लगती नेम नाना कोटी ।। ४।।


तीर्थ जपराशी जप हृषीकेशी ।
मुखीं अहर्निशीं रामनाम ।। १।।
तीर्थाचें पैं तीर्थ नाम हें समर्थ ।
होईल कृतार्थ रामनामें ।। २।।
होईल साधन तुटेल बंधन ।
वाचे जनार्दन सुफळ सदा ।। ३।।
नामा म्हणे हरी उच्चार तूं करीं ।
उद्धरसी निर्धारीं इहलोकीं ।। ४।।


पाहतां ये परिपाटी आणिक नाहीं सृष्टी ।
नामेंविण दृष्टीं न दिसे माझ्या ।।१।।
नमचि समर्थ नामचि मथित ।
शंकरासी हेत रामनामीं ।। २।।
भरती सर्व काम वाचे रामनाम ।
न लगती ते नेम कर्मजाळ ।। ३।।
नामा म्हणे उच्चार न करीं तूं विचार ।
तुटेल येरझार नाना योनी ।। ४।।


तपाचें हें तप राम हें अमूप ।
करीं का रे जप रामनामीं ।। १।।
रामकृष्ण म्हणे वाचे नारायण ।
तुटेल बंधन यमपाश ।। २।।
साधेल साधन होती कोटी यज्ञ ।
राम जनार्दन जपे करीं ।। ३।।
नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी ।
म्हणे नरहरी एक्या भावें ।। ४।।


१०

हाचि नेम सारीं साधेल तो हरी ।
नाम हें मुरारी अच्युताचें ।। १।।
राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे ।
यादव मोहरे रामनाम ।। २।।
न लगती कथा नाना विकळता ।
नामचि स्मरतां राम वाचे ।। ३।।
नाम म्हणे राम आम्हां हाचि नेम ।
नित्य तो सप्रेम जप आम्हां ।। ४।।


११

करूं हें कीर्तन राम नारायण ।
जनीं जनार्दन हेंचि देखें ।। १।।
जगाचा जनक रामकृष्ण एक ।
न करितां विवेक स्मरें राम ।। २।।
तुटेल भवजाळ कां करिशी पाल्हाळ ।
सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ।। ३।।
नामा म्हणे गोविंद स्मरें तूं सावध ।
नव्हे तुज बाधा नाना विघ्नें ।। ४।।


१२

मायेचीं भूचरे रज तम सात्त्विक ।
रामनाम एक सोडवणें एक ।। १।।
राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान ।
नामें घडती यज्ञ कोटी देवा ।। २।।
न लगती साधनें नाना मंत्र विवेक ।
रामनामीं मुख रंगवी कां रे ।। ३।।
नामा म्हणे श्रीराम हेंचि वचन आम्हां ।
नित्य ते पौर्णिमा सोळा कळी ।। ४।।


१३

माझें मी करितां गेले हे दिवस ।
न धरीच विश्वास राम नामीं ।। १।।
अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी ।
राम पंचाक्षरी मंत्रसार ।। २।।
कां करिशी सांठा प्रपंच विस्तार ।
न तुटे येरझार नामेंविण ।। ३।।
नामा म्हणे ऐसें रामनामीं पिसें ।
तो उद्धरेल आपैसें इहलोकीं ।। ४।।


१४

नको नको माया सांडीं लवलाह्या ।
पुढील उपाया झोंबें कां रे ।। १।।
राम नाम म्हणे तुटेल बंधन ।
भावबंधमोचन एक्या नामें ।। २।।
स्मरतां पतित उद्धरेल यतार्थ ।
नाम हाचि स्वार्थ तया झाला ।। ३।।
नामा म्हणे हा जप करी तूं अमूप ।
नामें चुके खेप इये जनीं ।।४।।


१५

स्मरण करितां रामनामध्वनी ।
ऐकतांचि कर्णीं पळती यम ।। १।।
नामपाठ करा राम कृष्ण हरी ।
होतील कामारी ऋद्धि सिद्धि ।। २।।
साध्य तेंचि साधीं न करी उपाधी ।
जन्मांतरीच्या व्याधी हरती नामें ।। ३।।
नामा म्हणे सर्व राम हाचि भाव ।
नाहीं आणिक देव रामेंविण ।। ४।।


१६

रामकृष्णमाळा घालितां अढळ ।
तुटेल भवजाळ मायामोह ।। १।।
होशील तूं साधु न पावती बाधु ।
पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टेल तुज ।। २।।
जपतां रामनाम पुरती सर्व काम ।
आदि अंति नेम साधेल तुज ।। ३।।
नामा म्हणे कृतार्थ सर्व मनोरथ ।
न लगती ते अर्थ मायापाश ।। ४।।


१७

शरीर संपत्ती मायेचें टवाळ ।
वायांचि पाल्हाळ मिरवितोसी ।। १।।
नाम हेचि तारी विठ्ठलनिर्धारीं ।
म्हणे हरी हरी एक वेळां ।। २।।
स्मरतां गोपाळनामा वंदितील यम ।
न लगती नेम मंत्रबाधा ।। ३।।
नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम ।
राम हेंचि नाम स्मरें कां रे ।। ४।।


१८

कृष्णकथा संग जेणें तुटे पांग ।
न लगे तुज उद्योग करणें कांहीं ।। १।।
समर्थ सोयरा राम हा निधान ।
जनीं जनार्दनीं एक ध्यायी ।। २।।
नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार ।
तुटेल येरझार भवाब्धीची ।। ३।।


१९

भवाब्धीतारक रामकृष्ण नांव ।
रोहिणीची माव सकळ दिसे ।। १।।
नाम हेंचि थोर नाम हेंचि थोर ।
वैकुंठीं बिढार रामनामें ।। २।।
राम हे निशाणी जपतांची अढळ ।
वैकुंठ तात्काळ तया जीवा ।। ३।।
नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल ।
अंतीं तुज पावेल राम एक ।। ४।।


२०

जळाचा जळबिंदु जळींच तो विरे ।
तैसें हें विधारे पांचाठायीं ।। १।।
जीव शिव विचार नाम हें मधुर ।
जिव्हेसी उपचार रामनाम ।। २।।
रामनाम तारक शिव षडक्षरी ।
तैची वाचा करीं अरे मूढा ।। ३।।
नामा म्हणे ध्यान शिवाचें उत्तम ।
मंत्र हा परम रामनाम ।। ४।।


२१

करितां हरिकथा नाम सुखराशी ।
उद्धरी जीवासी एका नामें ।। १।।
तें हें रामनाम जपे तूं सप्रेम ।
जप हा सुगम सुफळ सदा ।। २।।
नामेंचि तरले नामेंचि पावले ।
नाम म्हणतां गेले वैकुंठासी ।। ३।।
नामा म्हणे एका नामेंसी विनटे ।
ते वैकुंठींचे पेठे पावले देखा ।। ४।।


२२

नामावांचूनि कांहीं दुकें येथें नाहीं ।
वेगीं लवलाहीं राम जपा ।। १।।
गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ ।
पावसी केवळ निजपद ।। २।।
धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध ।
नामेंचि चित्पद पावले देख ।। ३।।
नामा म्हणे राम वाचे जपा नाम ।
संसार भवभ्रम हरे नामें ।। ४।।


२३

म्हणतां वाचे नाम वंदी तया यम ।
काळादिक सम वंदी तया ।। १।।
ऐसें नाम श्रेष्ठ सकळांसी वरिष्ठ ।
उच्चारितां नीट वैकुंठ गाजे ।। २।।
तो हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा ।
न कळे तया उपमा आदिअंतीं ।। ३।।
नामा म्हणे पाठें नामाचेनि वाटें ।
तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी ।। ४।।


२४

विष्णुनाम श्रेष्ठ गाती देवऋषी ।
नाम अहर्निशी गोपाळाचें ।। १।।
हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि ।
असे चराचरीं जनार्दना ।। २।।
आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी ।
उमेप्रति करी उपदेश ।। ३।।
नामा म्हणे नाम महाजप परम ।
शंकरासी नेम दिनदिशीं ।। ४।।


२५

कां करतोसी सीण वाचे नारायण ।
जपतां समाधान होईल तुज ।। १।।
राम कृष्ण हरी नारायण गोविंद ।
वाचेसी हा छंद नामपाठ ।। २।।
वंदील तो यम कळिकाळ सर्वदा ।
न पावसी आपदा असत देही ।। ३।।
नामा म्हणे ओळंग शीण झाला संगें ।
प्रपंच वाउगे सांडी परते ।। ४।।


२६

नामाचेनि पाठे जातील वैकुंठें ।
तो पुंडलीक पेठे प्रकट असे ।। १।।
विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र ।
आणिक नाही शस्त्र नामाविण ।। २।।
पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती ।
मुनि हरिपंथी गेले ।। ३।।
नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी ।
जन्माची येरझारी हरे नामें ।। ४।।


२७

सर्वअंभूतीं भजें नमन करीं संता ।
नित्य त्या अच्युता स्मरण करी ।। १।।
ऐसी भजनी विनट सांपडेल वाट ।
रामकृष्ण नीट वैकुंठींची ।। २।।
न लगतीं साधनें वायाचि बंधन ।
हरिनामपंथीं जाण मुनि गेले ।। ३।।
नामा म्हणे थोर नामचि साधार ।
वैकुंठीं बिढार तयां भक्ता ।। ४।।


२८

तूं तव नेणता परि हरि तो जाणता ।
आहे तो समता सर्वां भूतीं ।। १।।
सर्वब्रह्म हरि एकचि निर्धारी ।
होशी झडकरी ब्रह्म तूंचि ।। २।।
अच्युत माधव अमृताच्या पाठें ।
लागतांचि वाते वंदी यम ।। ३।।
नामा म्हणे होशी जिवलग विष्णूचा ।
दास त्या हरीचा आवडता ।। ४।।

२९

कां करिसी सोस मायेचा असोस ।
नव्हे तुझा सौरस नामेंविण ।। १।।
नामचेचि मंत्र नामचेचि तंत्र ।
नामविण पवित्र न होती देखा ।। २।।
तिहीं लोकीं काहीं नामेंविण सर्वथा ।
अच्युत म्हणतां पुण्यकोटी ।। ३।।
नामा म्हणे ब्रह्म आदि अंतीं नेम ।
तें विटेवरी सम उभें असे ।। ४।।


३०

पवित्र परिकर हा उच्चार ।
उद्धरण साचार जगासी या ।। १।।
गोविंद केशव उच्चारीं श्रीराम ।
न लगती नेम अमूप जप ।। २।।
तें हें विठ्ठलरूप पिकलें पंढरीं ।
नाम चराचरीं विठ्ठल ऐसें ।। ३।।
नामा म्हणे विठ्ठल सर्वांत सखोल ।
उच्चारितां मोल न लगे तुज ।। ४।।


३१

पोशिसी शरीर इंद्रियांची बाधा ।
शेखीं तें आपदा करील तुज ।। १।।
नव्हे तुझें हित विषय पोषितां ।
हरी हरी म्हणतां उद्धरसी ।। २।।
वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी ।
परी नाम न म्हणसी अरे मूढा ।। ३।।
नामा म्हणे हेचि पंढरीये निधान ।
उच्चारिता जन तरले ऐसें ।। ४।।


३२

विषय खटपट आचार सांगसी ।
विठ्ठल न म्हणसी अरे मूढा ।। १।।
पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी ।
अंतीं हा निर्धारीं तारील सत्य ।। २।।
न लगे सायास करणें उपवास ।
नामाचा विश्वास ऐसा धरीं ।। ३।।
नामा म्हणे प्रेम धरीं सप्रेम ।
विठ्ठल हाचि नेम दिनदिशीं ।। ४।।


३३

नव्हे तुज हित म्हणतां विषय पोषिता ।
हरी हरी म्हणतां तरशील ।। १।।
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी ।
वेगीं हें उच्चारीं लवलाहीं ।। २।।
घडतील यज्ञ पापें भग्न होत ।
प्रपञ्च सर्वत्र होईल ब्रह्म ।। ३।।
नामा म्हणे हरिकथा हरी भवव्यथा ।
उद्धरसी सर्वथा भाक माझी ।। ४।।


३४

उपदेश सुगम आइके रे एक ।
नाम हें सम्यक विठ्ठलाचें ।। १।।
जनीं जनार्दन भावचि संपन्न ।
विठ्ठल उद्धरण कलीमाजीं ।। २।।
साधेल निधान पुरेल मनोरथ ।
नामेंचि कृतार्थ होसी जनी ं ।। ३।।
नामा म्हणे नाम घेई तूं झडकरी ।
पावशी निर्धारीं वैकुंठपद ।। ४।।


।। इति श्रीनामदेव महाराज हरिपाठ समाप्त ।।


व्हॉट्सअॅप