१. हरीचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ।। १।।
हरी मुखीं गातां हरपली चिंता ।
त्या नाहीं मागुता जन्म घेणें ।। २।।
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे ।
तेचि झालीं अंगें हरिरूप ।। ३।।
हरिरूप झालें जाणीव हरपले ।
मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ।।४।।
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं ।
एका जनार्दनीं हरि बोला ।। ५।।
२. हरि बोला हरि बोला नातरी अबोला ।
व्यर्थ गलबला करूं नका ।। १।।
नको अभिमान नको नको मान ।
सोडीं मीतूंपण तोचि सुखी ।। २।।
सुखी त्याणें व्हावें जगा निववावें ।
अज्ञानी लावावे सन्मार्गासी ।। ३।।
मार्ग जया कळे भावभक्तिबळें ।
जगाचिये मेळे न दिसती ।। ४।।
जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं ।
एका जनार्दनीं ओळखिलें ।। ५।।
३. ओळखिला हरी धन्य तो संसारी ।
मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ।। १।।
सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे ।
नेलें राजहंसें पाणी काय ।। २।।
काय तें कराव्एं संदेहीं निर्गुण ।
ज्ञानानें सगुण ओस केलें ।। ३।।
केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें ।
उपजले मेले ऐसे किती ।। ४।।
एका जनार्दनीं नाहीं यातायाती ।
सुखाची विश्रांती हरीसंगें ।। ५।।
४. जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप ।
पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ।। १।।
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव ।
तयाविण ठाव रिता कोठें ।। २।।
वैष्णवांचें गुह्य मोक्षांचा एकांत ।
अनंतासी अंत पाहतां नाहीं ।। ३।।
आदि मध्य अवघा हरि एक ।
एकाचे अनेक हरि करी ।। ४।।
एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही ।
एका जनार्दनीं ऐसें केलें ।। ५।।
५. नामाविण मुख सर्पाचें तें बीळ ।
जिव्हा काळसर्प आहे ।। १।।
वाचा नव्हे लांब जळो त्याचें जिणें ।
यातना भोगणें यमपुरीं ।। २।।
हरीविण कोणी नाहीं सोडविता ।
पुत्र बंधु कांता संपत्तिचे ।। ३।।
अंतकाळीं कोणी नाहीं बा सांगाती ।
साधूचे संगतीं हरी जोडे ।। ४।।
कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही ।
एका जनार्दनीं पाठ केलीं ।। ५।।
६. धन्य माय व्याली सुकृताचें फळ ।
फळ निर्फळ हरीविण ।। १।।
वेदांताचें बीज हरि हरि अक्षरें ।
पवित्र सोपारें हेंचि एक ।। २।।
योग याग व्रत नेम दानधर्म ।
नलगे साधन जपतां हरि ।। ३।।
साधनाचें सार नाम मुखीं गातां ।
हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ।। ४।।
नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी ।
एका जनार्दनीं हरि बोला ।। ५।।
७. बहुतां सुकृतें नरदेह लाधला ।
भक्तीविण गेला अधोगती ।। १।।
पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म ।
न कळेचि वर्म अरे मूढा ।। २।।
अनंत जन्मींचें सुकृत पदरीं ।
त्याचे मुखीं हरि पैठा होय ।। ३।।
राव रंक हो कां उंच नीच याती ।
भक्तीविण माती मुखीं त्याच्या ।। ४।।
एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां ।
मुक्ती सायुज्यता पाठी लागे ।। ५।।
८. हरिनामामृत सेवी सावकाश ।
मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ।। १।।
नित्य नामघोष जयाचे मंदिरीं ।
तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ।। २।।
वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे ।
अविनाशासी पाहे नाश कैचा ।। ३।।
एका तासामाजीं कोटि वेळा सृष्टी ।
होती जाती दृष्टि पाहें तोचि ।। ४।।
एका जनार्दनीं ऐसें किती झालें ।
हरिनाम सेविलें तोचि एक ।। ५।।
९. भक्तीविण पशु कशासी वाढला ।
सटवीने नेला कैसा नाहीं ।। १।।
काय माय गेली होती भूतापासीं ।
हरि न ये मुखासी अरे मूढा ।। २।।
पातकें करिता पुढें आहे पुसता ।
काय उत्तर देतां होशील तूं ।। ३।।
अनेक यातना यम करवील ।
कोण सोडवील तेथें तुजला ।। ४।।
एका जनार्दनीं सांगताहें तोंदें ।
आहा वाचा रडे बोलतांचि ।। ५।।
१०. स्वहिताकारणें संगती साधूची ।
भावें भक्ति हरीची भेटी तेणें ।। १।।
हरि तेथें संत संत तेथें हरी ।
ऐसें वेद चारी बोलताती ।। २।।
ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे ।
तेथें हे आंधळे व्यर्थ होती ।। ३।।
वेदार्थाचा गोंवा कन्याअभिलाष ।
वेदें नाहीं ऐसें सांगितलें ।। ४।।
वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी ।
एका जनार्दनीं हरि बोला ।। ५।।
११. सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया ।
आनंदपदीं जया म्हणती हरी ।। १।।
सत्पद निर्गुण चित्पद सगुण ।
सगुण निर्गुण हरिपायीं ।। २।।
तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी ।
गीतेमाजी हरि बोलियेले ।। ३।।
हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी ।
अभिमानियांसी नर्कवास ।। ४।।
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी ।
एका जनार्दनीं तेंचि झालें ।। ५।।
१२. नाकळे तें कळे कळे तें नाकळे ।
वळे तें ना वळें गुरुविणें ।। १।।
निर्गुण पावलें सगुणीं भजतां ।
विकल्प धरितां जिव्हा झडे ।। २।।
बहुरूपी घरी संन्यासाचा वेष ।
पाहोन तयास धन देती ।। ३।।
संन्याशाला नाहीं बहुरूपियाला ।
सगुणीं भजला तेथें पावे ।।४।।
अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं ।
एका जनार्दनीं ओळखिलें ।। ५।।
१३. ओळखिला हरि सांठविला पोटीं ।
होतां त्याची भेटी दुःख कैंचें ।। १।।
नर अथवा नारी हो कां दुराचारी ।
मुखीं गातां हरि पवित्र तो ।। २।।
पवित्र तें कुळ धन्य त्याची माय ।
हरि मुखें गाय नित्य नेमें ।। ३।।
काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं ।
नाहीं अधिकारी ऐसा येथें ।। ४।।
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी ।
एका जनार्दनीं हरि बोला ।। ५।।
१४. हरि बोला देतां हरि बोला घेतां ।
हांसतां खेळतां हरि बोला ।। १।।
हरि बोला गातां हरि बोला खातां ।
सर्व कार्य करितां हरि बोला ।। २।।
हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं ।
देहत्यागाअंतीं हरि बोला ।। ३।।
हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां ।
उठतां बैसतां हरि बोला ।। ४।।
हरि बोला जनीं हरि बोला विजनीं ।
एका जनार्दनीं हरि बोला ।। ५।।
१५. एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच ।
छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ।। १।।
कल्पना अविद्या तेणे झाला जीव ।
मायोपाधी शिव बोलिजेति ।। २।।
जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग ।
सिंधु तो अभंग नेणें हरी ।। ३।।
शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे ।
रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ।। ४।।
क्षेत्र क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी ।
एका जनार्दनीं हरि बोला ।। ५।।
१६. कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा ।
तेणें पडे गोंवा नेणे हरी ।। १।।
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची ।
इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ।। २।।
इच्छावे ते जवळी चरण हरीचे ।
चरण सर्व नारायण देतो तुज ।। ३।।
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी ।
घेतां जन्म कोटी हरि कैंचा ।। ४।।
एका जनार्दनीं सांपडली खूण ।
कल्पना अभिमान हरि झाला ।। ५।।
१७. काय पद्मनीचे षंढासी सोहळे ।
वांझेसी दोहाळे कैची होती ।। १।।
अंधापुढें दीप खरासी चंदन ।
सर्पासी दुधपान करूं नये ।। २।।
क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा ।
व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ।। ३।।
खळाची संगती उपयोगासी न ये ।
आपणा अपाय त्याचे संगे ।। ४।।
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी ।
एका जनार्दनीं तेचि भले ।। ५।।
१८. न जायेचि ताठा नित्य खटाटोप ।
मण्डुकीं वटवट तैसे ते गा ।। १।।
प्रेमावीण भजन नाकाविण मोती ।
अर्थाविण पोथी वाचुनी काय ।। २।।
कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव ।
भावावीण देव कैसा पावे ।। ३।।
अनुतापेवीण भाव कैसा राहे ।
अनुभवें पाहें शोधूनियां ।। ४।।
पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी ।
एका जनार्दनीं अनुभविलें ।। ५।।
१९. परिमळ गेलिया वोस फुल देठीं ।
आयुष्या शेवटीं देह तैसा ।। १।।
घडीघडी काळ वाट याची पाहे ।
अजून किती आहे अवकाश ।। २।।
हाचि अनुताप घेऊन सावध ।
कांहीं तरी बोध करीं मना ।। ३।।
एक तास उरला खट्वांग रायासी ।
भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ।। ४।।
सांपडला हरि तयाला साधनीं ।
एका जनार्दनीं हरि बोला ।। ५।।
२०. करा रे बापांनो साधन हरीचें ।
झणीं करणीचें करूं नका ।। १।।
जेणें बा न ये जन्म यमाची यातना ।
ऐशिया साधना करा कांहीं ।। २।।
साधनाचें सार मंत्रबीज हरी ।
आत्मतत्त्व धरी तोचि एक ।। ३।।
कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम ।
एक हरि नाम जपतां घडे ।। ४।।
एका जनार्दनीं न घ्यावा संशय ।
निश्चयेंसी होय हरिरूप ।। ५।।
२१. बारा सोळा जणी हरीसी नेणती ।
म्हणोनी फिरती रात्रंदिवस ।। १।।
सहस्र मुखांचा वर्णितां भागला ।
हर्ष जया झाला तेणें सुखें ।। २।।
वेद जाणूं गेला पुधें मौनावला ।
तें गुह्य तुजला प्राप्त कैंचें ।। ३।।
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा ।
दास सद्गुरूचा तोचि जाणे ।। ४।।
जाणते नेणते हरीचे ठिकाणीं ।
एका जनार्दनीं हरि बोला ।। ५।।
२२. पिंडीं देहस्थिती ब्रह्मांडीं पसारा ।
हरिविण सार व्यर्थ भ्रम ।। १।।
शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी ।
हरिसी जाणोनि हरिच झाले ।। २।।
या रे या रे धरूं हरिनाम तारूं ।
भवाचा सागरू भय नाहीं ।। ३।।
साधुसंत गेले आनंदीं राहिले ।
हरिनामें झाले कृतकृत्य ।। ४।।
एका जनार्दनीं मांडिलें दुकान ।
देतो मोलावीण सर्व वस्तु ।। ५।।
२३. आवडीनें भावें हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।। १।।
नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।
पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।। २।।
सकळ जीवांचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसें नाहीं ।। ३।।
जैसी स्थिति आहे तैशापरी राहें ।
कौतुक तूं पाहें संचिताचें ।। ४।।
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपें त्याचा नाश झाला ।। ५।।
२४. दुर्बळाची कन्या समर्थाने केली ।
अवदसा निमाली दरिद्राची ।। १।।
हरिकृपा होतां भक्तां निघती दोंदें ।
नाचती स्वानंदें हरिरंगीं ।। २।।
देव भक्त दोन्ही एकरूप झाले ।
मुळींच संचलें जैसें तैसें ।। ३।।
पाजळली ज्योती कापुराची वाती ।
ओवाळितां आरती भेद नुरे ।। ४।।
एका जनार्दनीं कल्पेंची मुराला ।
तोचि झाला ब्रह्मरूप ।। ५।।
२५. मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष ।
तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ।। १।।
कानीं जें पेरिलें डोळां तें उगवलें ।
व्यापकें भारले तोचि हरि ।। २।।
कर्म\-उपासना\-ज्ञानमार्गीं झाले ।
हरिपाठीं आले सर्व मार्ग ।। ३।।
नित्य प्रेमभावें हरिपाठ गाय ।
हरिकृपा होय तयावरी ।। ४।।
झाला हरिपाठ बोलणें येथूनी ।
एका जनार्दनीं हरि बोला ।। ५।।