श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो देव जगन्मोहन । मोहिनीमोहना आद्यकारण ।
कार्यकारणातीत चिद्धन । जय जनार्दन जगद्गुरु ॥१॥
जगासी पडे मायामोहन । तें तूं निर्दळिसी ज्ञानघन ।
जगीं जगद्रूप जनार्दन । कृपाळू पूर्ण दीनांचा ॥२॥
दीनासी देवमाया स्त्रीरुपें । भुलवी हावभावखटाटोपें ।
ते स्त्रीमोहादि मोहक रुपें । जनार्दनकृपें निर्दळिती ॥३॥
जेथ वैराग्य वाढे संपूर्ण । तेथ जनार्दनाची कृपा पूर्ण ।
वैराग्य तेथ ब्रह्मज्ञान । सहजें जाण ठसावे ॥४॥
जीव सहजें ब्रह्मचि आहे । तो मायागुणें जीवत्व वाहे ।
जेवीं भद्रीं निजेलेनि रायें । तो स्वप्नींचें लाहे रंकत्व ॥५॥
त्यासी राजपदा यावया जाण । सेवक करिती थापटण ।
तेवीं वैराग्य निर्दळी त्रिगुण । जीवा ब्रह्मपण स्वयंभचि ॥६॥
ऐसें स्वयंभ जोडल्या ब्रह्म पूर्ण । तेव्हां स्त्री पुरुष हें मिथ्या ज्ञान ।
मृपा दृश्याचें दृश्यभान । भोग्यभोक्तेपण असेना ॥७॥
असो साधकासी देवमाया । स्त्रीरुपें ये भुलवावया ।
तेथ स्मरतां भावें गुरुराया । जाय विलया स्त्रीबाधू ॥८॥
सद्गुरुचें निजनाम एक । निवारी बाधा महादोख ।
वैराग्य उपजवी अलोलिक । तेणें होय निजसुख साधकां ॥९॥
निर्विशेष निजसुखदाता । आम्हां सद्गुरुचि तत्त्वतां ।
त्याचे चरणीं ठेवितां माथा । सुखसंपन्नता साधकां ॥१०॥
संत साधकांची निजमाउली । शांति निजसुखाची साउली ।
जनार्दनकृपेच्या पाउलीं । कथा चालिली यथार्थ ॥११॥
हाता आलिया निजनिर्गुण । साधक होती सुखसंपन्न ।
तदर्थ करावें माझें भजन । हें बोलिला श्रीकृष्ण पंचविसावां ॥१२॥
भावें करितां भगवद्भजन । देव दारारुपें करिती विघ्न ।
तें निर्दळावया जाण । माझें नामस्मरण करावें ॥१३॥
अच्युत हें स्मरतां नाम । प्रतापें निर्दळी कर्माकर्म ।
सकळ पातकें करी भस्म । दाटुगें नाम हरीचें ॥१४॥
नामें होइजे विरक्त । नामें निर्मळ होय चित्त ।
नामें साधे गुणातीत । नामें निर्मुक्त भवपाश ॥१५॥
नामीं लोलिंगत चित्त । भवभय रिघों न शके तेथ ।
नामीं विश्वास ऐसा जेथ । भगवंत तेथ तुष्टला ॥१६॥
दुष्टसंगें विषयासक्त । जरी झाला लोलिंगत ।
अनुताप उपजलिया तेथ । होय विरक्त क्षणार्धें ॥१७॥
महादोषासी प्रायश्चित्त । केवळ अनुताप निश्चित ।
अनुतापेंवीण प्रायश्चित्त । जो जाण एथ विटंबू ॥१८॥
अनुतापाएवढा सखा । जगीं आणिक नाहीं लोकां ।
धडाडिल्या अनुताप देखा । सकळ पातकां निर्दळी ॥१९॥
अनुतापा चढलिया हात । क्षणार्धें करी विरक्त ।
येचि अर्थी ऐलगीत । हरि सांगत उद्धवा ॥२०॥
सव्विसाव्या अध्यायीं येथ । विषयासक्त ज्याचें चित्त ।
त्यासी व्हावया विरक्त । ऐलगीतप्रस्तावो ॥२१॥
श्रीभगवानुवाच -
मल्लक्षणमियं कायं लब्ध्वा मद्धर्म आस्थितः ।
आनन्दं परमात्मानमात्मस्थं समुपैति माम् ॥१॥
ब्रह्म लक्षिजे परिपूर्ण । हेंचि कायेचें मुख्य लक्षण ।
तें हें मानवी शरीर जाण । परम पावन तिहीं लोकीं ॥२२॥
मनुष्यदेहीं अधर्म । करितां नातुडे परब्रह्म ।
तेथ करावे भागवतधर्म । जे कां परम पावन ॥२३॥
भागवतधर्में करितां भक्ती । निर्मळ होय चित्तवृत्ती ।
जीव तोचि ब्रह्म निश्चितीं । ऐशी शुद्ध स्फूर्ती ठसावे ॥२४॥
ठसावल्या ब्रह्मस्फूर्ती । होय स्वानंदाची अवाप्ती ।
तेणें परमानंदीं लीन होती । हे शुद्धप्राप्ती पैं माझी ॥२५॥
माझिये प्राप्तीचें लक्षण । देहीं असतां वर्तमान ।
सर्वथा नाहीं विषयस्फुरण । तेंचि निरुपण हरि सांगे ॥२६॥
गुणमय्या जीवयान्या विमुक्तो ज्ञाननिष्ठया ।
गुणेषु मायामात्रेषु दृश्यमानेष्ववस्तुतः ।
वर्तमानोऽपि न पुमान् युज्यतेऽवस्तुभिर्गुणैः ॥२॥
जे मूळ अज्ञानाची खाणी । जे संसारप्रवाहाची श्रेणी ।
जे तिहीं गुणांची जननी । माया राणी अनादि ॥२७॥
मायागुणयोगें पहा हो । सोळा कळांचा संभवो ।
तो वासनात्म्क लिंग देहो । जीवासी पहा हो दृढ झाला ॥२८॥
ज्या लिंगदेहाचिये प्राप्ती । भोगी नाना सुखदुःखसंपत्ती ।
पडे स्वर्गनरकआवर्ती । मिथ्यामरणपंक्ती स्वयें सोशी ॥२९॥
वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासी संसार ।
देहाभिमानें केला थोर । अपरंपार अनिवार्य ॥३०॥
तेथ गुरुवाक्यें ज्ञानानुभवो । पाहतां मायेचा अभावो ।
लिंगदेह झाला वावो । जीव जीवभावो तो मिथ्या ॥३१॥
जेवीं उगवलिया गभस्ती । अंधारेंसीं हारपे राती ।
तेवीं गुरुवाक्यें ज्ञानप्राप्ती । मायेची स्थिती मावळे ॥३२॥
एवं नासल्या गुणविकार । जीवन्मुक्त होती नर ।
जेवीं कां कुलालचक्र । भंवे साचार पूर्वभ्रमणें ॥३३॥
तेवीं प्रारब्धशेषवृत्तीं । ज्ञाते निजदेहीं वर्तती ।
वर्ततांही देहस्थिती । देहअहंकृती असेना ॥३४॥
जेवीं कां छाया आपुली । कोणीं गांजिली ना पूजिली ।
परी कळवळ्याची न ये भुली । तेवीं देहींची चाली सज्ञाना ॥३५॥
तो देहाचेनि दैवमेळें । जरी विषयांमाजीं लोळे ।
परी विकाराचेनि विटाळें । वृत्ति न मैळे अणुमात्र ॥३६॥
त्यासी विषयांचें दर्शन । समूळत्वें मिथ्या जाण ।
करितां मृगजळाचें पान । करा वोलेपण बाधीना ॥३७॥
गगनकमळांचा आमोद । जैं भ्रमर सेवी सुगंध ।
तैं सज्ञाना विषयसंबंध । निजांगीं बाध लागतां ॥३८॥
असो अतर्क्य मुक्तांची स्थिती । परी मुमुक्षांलागीं श्रीपती ।
नियमाची यथानिगुती । निजात्मप्राप्तीलागीं सांगे ॥३९॥
सङंग न कुर्यादसतां शिश्नोदरतृपां क्वचित् ।
तस्यानुगस्तमस्यन्धे पतत्यन्धानुगोऽन्धवत् ॥३॥
शिश्नोदरार्थ आसक्त । स्वधर्मत्यागें अधर्मरत ।
ऐसे जे विषयासक्त । ते जाण निश्चित असाधू ॥४०॥
ऐसे जे असाधु जन । त्यांसीं सर्वथा आपण ।
संगती न करावी जाण । कायावाचामनःपूर्वक ॥४१॥
वोढाळेचे संगतीं पाहें । क्षणभरी गेलिया धर्मगाये ।
त्या क्षणासाठीं पाहें । लोढणें वाहे निरंतर ॥४२॥
यालागीं दुर्जनाची संगती । क्षणार्धें पाडी अनर्थी ।
मुमुक्षीं ऐशियाप्रती । अणुमात्र वस्ती न वचावें ॥४३॥
लोहाराची आगिठी जैसी । सहजें पोळी भलत्यासी ।
दुर्जनाची संगति तैशी । पाडीं अपभ्रंशीं भाविकां ॥४४॥
अवचटें असाधुसंगती । जोडल्या वाढे विषयासक्ती ।
तेणें उठी अधर्मरती । विवेक-स्फूर्तिघातक ॥४५॥
मावळल्या विवेकवृत्ती । अंध होय ज्ञानस्फूर्ती ।
आपण आपली न देखे गती । जेवीं आभाळीं राती अंवसेची ॥४६॥
जेवीं अंधें अंध धरिल्या हातीं । दोघां पतन महागर्ती ।
तेवीं अविवेकाचिया स्थितीं । अंधतमा जाती विषयांध ॥४७॥
कुसंगाचा जो सांगात । तेणें वोढवे नरकपात ।
अनुताप सोडविता तेथ । तें ’ऐलगीत’ हरि सांगे ॥४८॥
एलेः सम्राडिमां गाथामगायत बृहच्छ्रवाः ।
उर्वशीविरहान्मुह्यन्निर्विण्णः शोकसंयमे ॥४॥
समुद्रवलयांकित क्षिती । सकळ रायांचा राजपती ।
पुरुरवा चक्रवर्ती । ज्याची ख्याती पुराणीं ॥४९॥
तेज प्रभाव महाशौर्य । उचित वदान्य गांभीर्य ।
महिमा महती अतिवीर्य । धर्मधैर्य पुरुरवा ॥५०॥
राजधर्माचिया नीतीं । स्वधर्में प्रतिपाळी क्षिती ।
ब्राह्मण तितुका ब्रह्ममूर्ती । हा भाव निश्चितीं रायाचा ॥५१॥
प्राणान्तेंही आपण । न करी ब्राह्मणहेळण ।
गायीलागीं वेंची प्राण । करी संरक्षण दीनाचें ॥५२॥
ऐसा धार्मिक ऐल-चक्रवर्ती । तोही उर्वशीचे आसक्तीं ।
भुलोनि ठेला भूपती । निजात्मगती विसरला ॥५३॥
तेणें अनुतापें गाइली गाथा । ते तुज मी सांगेन आतां ।
परी त्याची पूर्वकथा । कामासक्तता ते ऐक ॥५४॥
विसरोनि निजमहत्त्वासी । अतिदीन झाला वेश्येसी ।
काम पिसें लावी मनुष्यासी । तें ऐल-इतिहासीं हरि सांगे ॥५५॥
ऐल-उर्वशीकामासक्ती । सवेंचि अनुतापें विरक्ती ।
हे कथा बोलिली वेदोक्तीं । तेचि यदुपति स्वयें सांगे ॥५६॥
उर्वशीपुरुरव्याचा संबंध। नवम स्कंधीं असे विशद ।
तेणें जाणोनियां गोविंद । एथ कथाअनुवाद न करीच ॥५७॥
पूर्वकथासंबंधः ॥ ॥ उर्वशी स्वर्गभूषण । नारायणें धाडिली आपण ।
तो उर्वशीसी गर्व पूर्ण । श्रेष्ठपण मानूनी ॥५८॥
तया गर्वाचिये स्थिती । ताल चुकली नृत्यगतीं ।
तेणें ब्रह्मशापाची प्राप्ती । तुज मानवी भोगिती भूतळीं ॥५९॥
उच्छाप मागतां तिसी । ब्रह्मा सांगे तियेपाशीं ।
नग्न देखिल्या पुरुरव्यासी । स्वर्गा येसी मेषप्रसंगें ॥६०॥
ऐशा लाहोनि शापासी । भूतळा आली उर्वशी ।
देखोनि तिचिया स्वरुपासी । पुरुरवा तिसी भूलला ॥६१॥
विसरोनि आपुली महंती । वश्य झाला वेश्येप्रती ।
रुपा भुलला भूपती । विचारस्फूर्ती विसरला ॥६२॥
नग्न देखिलिया रायासी । सांडूनि जावें उर्वशीं ।
ऐशी भाक देऊनि तिसी । निजभोगासी आणिली ॥६३॥
तिणें आपुलिया उच्छापासी । आणिलें दोघां एडक्यांसी ।
पुत्रस्नेहें पाळावें त्यांसी । तेविखीं भाकेसी दिधलें रायें ॥६४॥
ते उर्वशीच्या कामप्राप्ती । अतिशयें वाढली कामासक्ती ।
तो नेणे उदयास्त-दिवसराती । ऐशा अमित तिथी लोटल्या ॥६५॥
भोगितां उर्वशीकाम । विसरला स्वधर्मकर्म ।
विसरला नित्यनेम । कामसंभ्रम वाढला ॥६६॥
तेथ मेषरुपें दोघे जण । झाले आश्विनीकुमार आपण ।
उर्वशीभोगक्षया कारण । इंद्रें जाण पाठविले ॥६७॥
पुरुरव्याचा भोगप्रांतीं । उर्वशी न्यावया स्वर्गाप्रती ।
दोनी एडके चोर नेती । मध्यरातीं मेमात ॥६८॥
ऐकोनि मेषांच्या शब्दासी । दुःखें हडबडली उर्वशी ।
रागें निर्भर्त्सी रायासी। नपुंसक होसी तूं एक ॥६९॥
वृथा वल्गसी पुरुषबळें । चोरें नेलीं माझीं बाळें ।
जळो तुझें तोंड काळें । म्हणोनि कपाळें ते पिटी ॥७०॥
ऐकोनि स्त्रियेचा शोक थोरु । शस्त्र घेऊनि सत्वरु ।
धांवतां फिटला पीतांबरु । तें नृपवरु स्मरेना ॥७१॥
पराभवूनि ते चोर । मेष आणितां सत्वर ।
विद्युल्लता झळकली थोर । तंव नग्न शरीर रायाचें ॥७२॥
नग्न देखोनि रायासी । सांडूनि निघाली उर्वशी ।
तिचेनि वियोगें मानसीं । अतिशोकासी पावला ॥७३॥
त्यक्त्वा ऽऽत्मानं व्रजन्तीं तां, नग्न उन्मत्तवन्नृपः ।
विलपन्नन्वगाज्जाये, घोरे तिष्ठेति विक्लवः ॥५॥
पृथ्वीपरिपालनीं वरिष्ठ । स्वधर्मी धार्मिक श्रेष्ठ ।
शत्रुदमनीं अतिसुभट । प्रतापें उद्भट महावीर ॥७४॥
जाणे वेदशास्त्रविवेक । ज्यासी वंदिती सकळ लोक ।
तोही वेश्येचा केवळ रंक । झाला देख निजांगें ॥७५॥
सुरां असुरां न खालवी मान । जो अल्पही न साहे अपमान ।
तो वेश्येलागीं झाला दीन । निजसन्मान विसरोनी ॥७६॥
उर्वशी जातां देखोनि दिठीं । नग्न उन्मत्त उठाउठीं ।
रडत पडत लागे पाठीं । स्फुंदतां पोटीं श्वास न रिघे ॥७७॥
डोळेभरी पाहूं दे दिठीं । सांगेन जीवींच्या गुह्य गोष्टी ।
प्राण रिघों पाहे उठाउठी । क्षणभर भेटी न देतां ॥७८॥
आपुल्या पूर्वजांची आण । कदा नुल्लंघीं तुझें वचन ।
सत्य मानीं माझें प्रमाण । तुज काय कारण रुसावया ॥७९॥
तुज चालतां लवलाहीं । झणीं खडे रुततील पायीं ।
तुज जाणें कोणे ठायीं । तरी सवें मीही येईन ॥८०॥
जाऊं नको उभी राहें । परतोनी मजकडे पाहें ।
म्हणोनि धरुं धांवे पाये । तंव ते जाये उपेक्षुनी ॥८१॥
ज्यासी राजे मुकुटमणी । सदा येती लोटांगणीं ।
तो लागे वेश्येचे चरणीं । बाप करणी कामाची ॥८२॥
तुझी मज अति कळवळ । तुजलागीं मन माझें कोमळ ।
तूं कठिण झालीस केवळ । कोप प्रबळ कां धरिला ॥८३॥
यापरी रायाचें चित्त । विरहातुर शोकाकुलित ।
अतिशयें ग्लानियुक्त । ते ग्लानि सांगत श्रीकृष्ण ॥८४॥
कामानतृप्तोऽनुजुषन्, क्षुल्लकान्वर्षयामिनीः ।
न वेद यान्तीर्नायान्तीरुर्वश्याकृष्टचेतनः ॥६॥
उर्वशीकामीं कामासक्त । एकाग्र झालें रायाचें चित्त ।
नेणे सूर्याचें गतागत । केला भ्रांत कंदर्पें ॥८५॥
भोगिलीचि कामिनी । भोगितांही अनुदिनीं ।
अधिक प्रेम वाढलें मनीं । ऐसा तिजलागूनी आसक्त ॥८६॥
भोगितां उर्वशीकामासी । नेणे दिवसमासवर्षांसी ।
व्ययो झाला आयुष्यासी । हेंही त्यासी स्मरेना॥८७॥
जेवीं अग्निमाजीं घृत पडे । तंव तंव ज्वाळा अधिक वाढे ।
तेवीं कांता भोगितां वाडेंकोडें । काम पुढें थोरावे ॥८८॥
विचारितां स्त्रीकामासी । अतितुच्छत्व दिसे त्यासी ।
तोही भोगितां अहर्निशीं । विरक्ती रायासी नुपजेचि ॥८९॥
प्रीति गुंतली उर्वशीसीं । अतिग्लानी करितां तिसी ।
परतोनि न येचि रायापाशीं । निघे वेगेंसीं सांडूनि ॥९०॥
उर्वशी न देखुनि पुढें । राजा विरहें मूर्च्छित पडे ।
पाहों धांवे इकडेतिकडे । आक्रोशें रडे अतिदुःखी ॥९१॥
अटण करितां दाही दिशीं । अवचटें आला कुरुक्षेत्रासी ।
तंव अतिरिक्षीं उर्वशी । देखे दृष्टीसी नृपनाथ ॥९२॥
देखोनि म्हणे धांव पाव । मजलागीं दे कां वेगीं खेंव ।
येरी म्हणे मूढभाव । सांडीं सर्व विषयांधा ॥९३॥
आम्हां स्त्रियांची आसक्ती । कदा धड नव्हे गा भूपती ।
सदा स्त्रियांची दुष्ट जाती । जाण निश्चितीं महाराजा ॥९४॥
विशेषें आम्ही स्वैरिणी । स्वेच्छा परपुरुषगामिनी ।
आमुचा विश्वास मनीं । झणीं न मानीं नृपनाथा ॥९५॥
आम्हां प्रमदांच्या संगतीं । राया ठकले नेणों किती ।
आतां सांडूनि आमची आसक्ती । होईं परमार्थी विरक्त ॥९६॥
बहु काळ भोगितां माझा भोग । आद्यापि नुपजे तुज विराग ।
कामासक्ति सांडूनि साङग । साधीं चांग निजस्वार्थ ॥९७॥
राजा ग्लानि करी अनेग । एकवेळ निजांगें अंग ।
मज देई अंगसंग । सुखसंभोग भामिनी ॥९८॥
निलाग देखोनि ग्लानीसी । कृपेनें द्रवली उर्वशी ।
मग ते आपुल्या पूर्व वृत्तांतासी । रायापाशीं निवेदी ॥९९॥
मी स्वर्गांगना अतिसुरुप । मज घडला ब्रह्मशाप ।
तूं महाराजा पुण्यरुप । संगें निःशाप मी झालें ॥१००॥
तुझेनि संगें मी निर्धूत । शाप निस्तरले समस्त ।
मज तुज संग न घडे एथ । मी असें जात स्वर्गासी ॥१॥
ऐकोनि उर्वशीचें वचन । राजा विरहें करी रुदन ।
तेव्हां कळवळलें तिचें मन । त्या उपाय पूर्ण दाविला ॥२॥
प्रार्थूनियां गंधर्वांसी । अग्निस्थाली दिधली रायासी ।
यावरी करुनि यागासी । मज पावसी महाराजा ॥३॥
उर्वशीवियोगें व्यथाभूत । अग्निस्थाली उपेक्षूनि तेथ ।
राजा निजमंदिरा येत । शोकाकुलित अतिदुःखी ॥४॥
उर्वशीची व्यथा रायासी । स्वप्नीं देखिलें तियेसी ।
त्वरेनें पाहूं आला स्थालीसी । तंव देखे अश्वत्थासी शमीगर्भा ॥५॥
त्याच्या अरणी करुनि देख । यज्ञाग्नि पाडिला चोख ।
यजूनि पावला उर्वशीलोक । कामसुखभोगेच्छा ॥६॥
भोग भोगितां उर्वशीसीं । विरक्ति उपजली रायासी ।
तो जें बोलिला अनुतापेंसीं । तें ऐक तुजसी सांगेन ॥७॥
अठरा श्लोकांचें निरुपण । राजा बोलिला आपण ।
आठे श्लोकीं अनुताप पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥८॥
ऐल उवाच - अहो मे मोहविस्तारः कामकश्मलचेतसः ।
देव्या गृहीतकण्ठस्य, नायुःखण्डा इमे स्मृताः ॥७॥
ऐलगीताचा अनुताप । नाशी अगम्यागमनपाप ।
करी श्रोत्यांसी निष्पाप । साधकां कंदर्प बाधीना ॥९॥
जेवीं मदगज गजीसंगीं । नाना आपत्ति स्वयें भोगी ।
तेवीं उर्वशीच्या संभोगीं । झाला विरागी पुरुरवा ॥११०॥
जो उर्वशीलागीं अनुरक्त । तोचि तिसीं झाला विरक्त ।
तेणें वैराग्यें अनुतापयुक्त । स्वयें बोलत ऐलरावो ॥११॥
माझ्या मोहाचा विषयविस्तार । कामासक्त कामातुर ।
कुश्चित कंदर्पाचें घर । म्यांचि साचार सेविलें ॥१२॥
उर्वशीकामें अतिआसक्त । कामातुर झालें चित्त ।
तेणें म्यां जोडिला अनर्थ । थितें केलें व्यर्थ आयुष्य ॥१३॥
उर्वशी कंठसल्लग्न शस्त्र । आयुष्यच्छेदनीं सतेजधार ।
छेदिलें आयुष्य अपार । तें मी पामर स्मरेना ॥१४॥
कांताआलिंगन विषवल्ली । म्यां कंठीं घातली सुकाम भुलीं ।
तिणें आयुष्याची होळी केली । विवेक समूळीं गिळिला ॥१५॥
कामिनीकामआलिंगनीं । कंठीं पेटविला दावाग्नी ।
तो धडाडिला आयुष्यवनीं । विवेकअवनी जाळित ॥१६॥
नरदेहींचें उत्तमोत्तम । अमूल्य आयुष्य केलें भस्म ।
जळो जळो माझें कर्म । निंद्य अधर्म तो एक ॥१७॥
नरदेहींच्या आयुष्यपुष्टी । साधक रिघाले वैकुंठी ।
ज्ञाते ब्रह्म होती उठाउठीं । तें म्यां कामासाठीं नाशिलें ॥१८॥
नाहं वेदाभिनिर्मुक्तः, सूर्योवाऽभ्युदितोऽमुया ।
मुषितो वर्षपूगानां, बताहानि गतान्युत ॥८॥
नरदेहाचा आयुष्यक्षण । न मिळे देतां कोटी सुवर्ण ।
तें म्यां नाशिलें संपूर्ण । आपणया आपण नाडिलें ॥१९॥
साधूंचिया निजस्वार्था । साधूनि द्यावया उगवे सविता ।
निमेषोन्मेषें परमार्था । साधक तत्त्वतां साधिती ॥१२०॥
तोचि सविता सकामासी । आयुष्य हरी अहर्निशीं ।
हें न कळे ज्याचें त्यासी । नरकपातासी निजमूळ ॥२१॥
पुढिलांची गोठी ते कायसी । मीच नाडलों उर्वशीपासीं ।
र्हालस झाला आयुष्यासी । हे हानि कोणासी सांगावी ॥२२॥
जनांचिया हितासी वहिला । सूर्यो अनुदिनीं उगवला ।
तें मी नेणेंचि दादुला । उर्वशीकामें भुलला उन्मत्त ॥२३॥
सूर्याचा उदयो अस्तमान । वर्षेंही लोटल्या नाहीं ज्ञान ।
करितां उर्वशी-अधरपान । तेणें मदें संपूर्ण मातलों ॥२४॥
मद्यमदु उतरे दिनांतीं । धनमदु जाय निधनस्थितीं ।
तारुण्यमदु जाय क्षीणशक्ती । स्त्रीमदप्राप्ती कदा नुतरे ॥२५॥
नरदेहाची आयुष्यकथा । पुढती दुर्लभ न लभे हाता ।
जळो हे उर्वशी देवकांता । इणेंचि तत्त्वत्तां नागविलों ॥२६॥
मी निर्भय रक्षिता सर्वांसी । त्या मज नागविलें उर्वशीं ।
हे लाज सांगों कोणापाशीं । उकसाबुकसीं स्फुंदत ॥२७॥
माझ्या निजहिताचा चोरु । हे उर्वशी जीवें मारुं ।
सवेंचि उपजला विचारु । येथ मीचि पामरु अविवेकी ॥२८॥
मग म्हणे कटकटा । सृष्टीमाजीं मी करंटा ।
आयुष्य नाशिलें कामचेष्टा । अपाव मोठा मज झाला ॥२९॥
मग आक्रंदे अतिगर्जोनी । कामें नागविलों आयुष्य हरोनी ।
यहीहोनि अधिक हानी । पाहतां ये जनीं असेना ॥१३०॥
अहो मे आत्मसंमोहो, येनात्मा योषितां कृतः ।
क्रीडामृगश्चक्रवर्ती, नरदेवशिखामणिः ॥९॥
राजे मुकुटांचे प्रतापी पूर्ण । माझ्या चरणा येती शरण ।
तो मी वेश्येचे घरीं चरण । हें निर्लज्जपण म्यां केलें ॥३१॥
मज पुरुरव्याचे आज्ञेंकरीं । राजे नाचती चराचरीं ।
तो मी वेश्येचे आज्ञेवरी । श्वानाचेपरी वर्तलों ॥३२॥
जैसें वानर गारुडयाचें । तैसा स्त्रियेचेनि छंदें नाचें ।
माझ्या चक्रवर्तीपणाचें । अतिनिंद्य साचें फळ झालें ॥३३॥
सकळ राजे मज देती सन्मान । भूपति सदा वंदिती चरण ।
तो मी झालों स्त्रियेआधीन । हीनदीन अतिरंक ॥३४॥
राखतां स्त्रियेचा रसरंगप्रेम । पायां पडणें हें उचित कर्म ।
म्हणती ते जळो जन सकाम । हेचि धाडी परम कामाची ॥३५॥
मी वलयांकित चक्रवर्ती । तोही योषिता घातलों आवर्ती ।
त्याचि आवर्ताची स्थिती । स्वमुखें भूपति अनुवादे ॥३६॥
सपरिच्छदमात्मानं, हित्वा तृणमिवेश्वरम् ।
यान्तीं स्त्रियं चान्वगमं, नग्न उन्मत्तवद्रुदन् ॥१०॥
केवळ साकार मायाभ्रम । यालागीं ’प्रमदा’ स्त्रीचें नाम ।
संगें ठकिले उत्तमोत्तम । स्त्रीसंभ्रम वाढवितां ॥३७॥
प्रमदा अंबरें अलंकार । हें मायेचें सोलीव सार ।
एथ भुलले थोरथोर । मीही पामर स्त्रीसंगें ॥३८॥
माझीच मज करणी । दिसतसे दैन्यवाणी ।
उर्वशी वेश्या कामचारिणी । जे बहुजनीं भोगिली ॥३९॥
ऐशियेच्या कामासक्तता । मी सर्वस्वें भुललों सर्वथा ।
ते भुललेपणाची कथा । अनुतापतां स्वयें बोले ॥१४०॥
धर्मपत्नीणसीं भोगितां काम । सहसा नासेना स्वधर्म ।
मज वोढवलें दुष्ट कर्म । वेश्येसी परम भुललों ॥४१॥
परदारा अभिलाषिती । ते अवश्य नरका जाती ।
मा स्वदारा-कामासक्ती । तेथही अधोगती सोडीना ॥४२॥
स्त्रियां भुलविले हरिहर । स्त्रियां भुलविले ऋषीश्वर ।
स्त्रियां भुलविले थोरथोर । मीही किंकर स्त्रियां केलों ॥४३॥
राज्य आणि राजवैभव । वेश्येअधीन केलें सर्व ।
याहीहूनि केलें अपूर्व । तीलागीं जीव अर्पिला ॥४४॥
मी राजवर्यां मुकुटमणी । तो दास झालों तिचे चरणीं ।
बाप कंदर्पाची करणी । केलों कामिनीअधीन ॥४५॥
ऐशिया मज राजेश्वरातें । वेश्येनें हाणोनि लातें ।
उपेक्षूनियां तृणवतें । निघालि निश्चितें सांडोनी ॥४६॥
तीसी जातां देखोनियां पुढें । मी नागवा धांवें लवडसवडें ।
लाज सांडोनियां रडें । तरी ते मजकडे पाहेना ॥४७॥
जेवीं कां लागलें महद्भूत । नातरी पिशाच जैसें उन्मत्त ।
तेवीं नागवा धांवें रडत । तरी तिचें चित्त द्रवेना ॥४८॥
तरी रडत पडत अडखळत । मी निर्लज्ज तीमागें धांवत ।
माझे मोहाचा अतिअनर्थ । अपमानग्रस्त मज झाला ॥४९॥
कुतस्तस्यानुभावः स्यात्तेज ईशित्वमेव वा ।
योऽन्वगच्छं स्त्रियं यान्तीं खरवत्पादताडितः ॥११॥
मी महत्त्वें राजराजेश्वरु । ऐसा गर्व होता अति दुर्धरु ।
तो मी वेश्येचा अनुचरु । झालों किंकरु निजांगें ॥१५०॥
एवढाही मी राजेश्वरु । मागें धांवें होऊनि किंकरु ।
तरी ते न करी अंगीकारु । जेवीं वोसंडी खरु खरी जैशी ॥५१॥
जेवीं खरी देखोनियां खरु । धांवोनि करी अत्यादरु ।
येरी उपेक्षूनि करी मारु । अतिनिष्ठुरु लातांचा ॥५२॥
तिच्या लाता लागतां माथां । खरु निघेना मागुता ।
त्या खराऐशी मूर्खता । माझे अंगीं सर्वथा बाणली ॥५३॥
स्त्री उदास कामदृष्टीं । मीं आसक्त लागें पाठीं ।
माझ्या समर्थपणाची गोठी । सांगतां पोटीं मी लाजें ॥५४॥
ऐसें स्त्रीकामीं ज्याचें मन । त्याचें योग याग अनुष्ठान ।
अवघेंचि वृथा जाण । तेंचि निरुपण निरुपी ॥५५॥
किं विद्यया किं तपसा किं त्यागेन श्रुतेन वा ।
किं विविक्तेन मौनेन, स्त्रीभिर्यस्य मनो हृतम् ॥१२॥
स्त्रीकाममय ज्याचें मन । त्याची वृथा विद्या वृथा श्रवण ।
वृथा तप वृथा ध्यान । त्याग मुंडण तें वृथा ॥५६॥
वृथा एकांतसेवन । वृथा जाण त्याचें मौन ।
राखेमाजीं केलें हवन । तैसें अनुष्ठान स्त्रीकामा ॥५७॥
कामासक्त ज्याचें चित्त । त्याचे सकळही नेम व्यर्थ ।
आपुलें पूर्ववृत्त निंदित । अनुतापयुक्त नृप बोले ॥५८॥
स्वार्थस्याकोविदं धिङ्मां, मूर्खं पण्डितमानिनम् ।
योऽहमीश्वरतां प्राप्य, स्त्रीभिर्गोखरवज्जितः ॥१३॥
चहूं पुरुषार्थांचें अधिष्ठान । नरदेह परम पावन ।
जेणें देहें करितां भजन । ब्रह्म सनातन पाविजे ॥५९॥
नरदेहींचा क्षण क्षण । समूळ निर्दळी जन्ममरण ।
भावें करितां हरिस्मरण । महापापें जाण निर्दळती ॥१६०॥
त्या नरदेहाची लाहोनि प्राप्ती । नरवर्य झालों चक्रवर्ती ।
त्या माझी जळो जळो स्थिती । जो वेश्येप्रती भुललों ॥६१॥
मानी श्रेष्ठ मी सज्ञान । परी अज्ञानांहूनि अज्ञान।
नेणेंचि निजस्वार्थसाधन । वेश्येआधीन मी झालों ॥६२॥
लाभोनि नरदेहनिधान । म्यां देहीं धरिला ज्ञानाभिमान ।
न करींच निजस्वार्थसाधन । हें मूर्खपण पैं माझें ॥६३॥
जैसा गायीमागें कामयुक्त । धांवतां बैल न मानी अनर्थ ।
कां खरीमागें खर धांवत । तैसा कामासक्त मी निर्लज्ज ॥६४॥
खरी खरास हाणी लाताडें । तरी तो धसे पुढें पुढें ।
तैसाचि मीही वेश्येकडे । कामकैवाडें भुललों ॥६५॥
’कामभोगांतीं विरक्ती’ । ऐसें मूर्ख विवेकी बोलती ।
ते अधःपातीं घालिती । हे मज प्रतीति स्वयें झाली ॥६६॥
सेवतो वर्षपूगान्मे, उर्वश्या अधरासवम् ।
न तृप्यत्यात्मभूः कामो, वन्हिराहुतिभिर्यथा ॥१४॥
सत्ययुगींचें आयुष्य माझें । ऐश्वर्य सार्वभौमराज्यें ।
उर्वशी स्वर्गमंडनकाजें । सर्वभोगसमाजें भोगितां ॥६७॥
भोगितां लोटल्या वर्षकोटी । परी विरक्तीची नाठवे गोठी ।
मा ’वैराग्य भोगाचे शेवटीं’ । हे मिथ्या चावटी मूर्खांची ॥६८॥
स्त्रियेचें म्हणती अधरामृत । तेही मूर्ख गा निश्चित ।
तें उन्मादमद्य यथार्थ । अधिकें चित्तभ्रामक ॥६९॥
वनिताअधरपानगोडी । त्यापुढें सकळ मद्यें बापुडीं ।
तत्काळ अनर्थी पाडी । निजस्वार्थकोडीनाशक ॥१७०॥
घालितां कोटि घृताहुती । अग्नीसी कदा नव्हे तृप्ती ।
तेवीं वनिताकामासक्ती । कदा विरक्ती उपजेना ॥७१॥
ऐसा आठ श्लोकीं अनुताप । स्वयें बोलोनियां नृप ।
हृदयीं उपजला विवेकदीप । जेणें झडे कंदर्प तें स्मरलें ॥७२॥
सकामासी विषय त्यागितां । वासना न त्यागे सर्वथा ।
कां आदरें विषय भोगितां । विरक्ति सर्वथा उपजेना ॥७३॥
ऐशिये अर्थींचा उपावो । विचारोनि बोले रावो ।
कामत्यागाचा अभिप्रावो । साचार पहा हो संबोधी ॥७४॥
पुंश्चल्यापहृतं चित्तं, को न्वन्यो मोचितुं प्रभुः ।
आत्मारामेश्वरमृते, भगवन्तमधोक्षजम् ॥१५॥
पुरुष सदा स्त्रीअनुराग । परी सहसा न करवे प्रसंग ।
त्यासी पुंश्चलीचा घडल्या संग । ते बाधी निलाग हावभावीं ॥७५॥
पुंश्चलीचे कटाक्ष गुण । तेंचि पुरुषासी दृढ बंधन ।
स्त्रीकामबंधन सोडवी कोण । एक नारायणावांचूनि ॥७६॥
कामिनीकामापासूनि निर्मुक्त । कर्ता ईश्वर समर्थ ।
जो कां आत्माराम भगवंत । तोचि निश्चित सोडविता ॥७७॥
मायागुणें कामसंचार । अविद्या वाढवी साचार ।
मायानियंता जो ईश्वर । तो कामकरकर निर्दळी ॥७८॥
स्वस्वरुपीं रमण आराम । ऐसा जो कां आत्माराम ।
तो निवारी सकळ काम । करी निर्भ्रम निजात्मता ॥७९॥
जो भोग भोगूनि अभोक्ता । त्या शरण रिघाल्या अनंता ।
बाधूं न शके विषयावस्था । स्त्रीसंगीं सोडविता तो एक ॥१८०॥
जो निवारी अधोगती । तो अधोक्षज असतां भक्तपती ।
त्यासी शरण रिघाल्या निश्चितीं । कामासक्ती निवारी ॥८१॥
राजा कामासक्तीं अतित्रासला । सबाह्य विषयीं उदास झाला ।
त्याचा वासनाकाम जो उरला । तो न वचे त्यागिला त्याचेनीं ॥८२॥
सर्वभावेंसीं संपूर्ण । हरीसि रिघालिया शरण ।
सकळ कामाचें निर्दळण । सहजें जाण स्वयें होय ॥८३॥
एकाचा मतवाद निश्चितीं । करितां श्रुतिवाक्य व्युत्पत्ती ।
यजितां इंद्रादि देवांप्रती । कामनिवृत्ति हृदयस्थ ॥८४॥
ऐसें बोलती जे सज्ञान । ते सर्वथा गा अज्ञान ।
हरीसी न रिघतां शरण । कामसंचरण शमेना ॥८५॥
इंद्रादि देव कामासक्तीं । विटंबले नेणों किती ।
त्यांचेनि भजनें कामनिवृत्ति । जे म्हणती ते अतिमूर्ख ॥८६॥
बोधितस्यापि देव्या मे, सूक्तवाक्येन दुर्मतेः ।
मनोगतो महामोहो, नापयात्यजितात्मनः ॥१६॥
काम्य कर्मीं होईल सुख । हें बोलणें समूळ लटिक ।
काम्य कर्मीं अधिक दुःख । हें नेणती मूर्ख सकाम ॥८७॥
प्रत्यक्ष म्यां याग करुन । इंद्रादि देवांतें यजून ।
उर्वशीसंभोगा लाधून । अतिदुःखी जाण मी झालों ॥८८॥
नारायणऊरुसीं जन्मली । यालागीं ’उर्वशी’ नांव पावली ।
त्या मज श्रुतिवाक्यें बोधिलीं । निष्काम बोली अतिशुद्ध ॥८९॥
ऐकतां श्रुतिनिष्कामबोली । माझी न वचेच सकाम भुली ।
जंव गोविंदें कृपा नाहीं केली । तंव कामाची चाली खुंटेना ॥१९०॥
भावें हरीसी निघाल्या शरण । हृदयीं प्रकटे नारायण ।
तेव्हा सर्व काम सहजें जाण । जाती पळोन हृदयस्थ ॥९१॥
उर्वशीकामसंगें जाण । थोर कष्टलों मी आपण ।
असो तिचा अपराध कोण । मीचि हरिस्मरण विसरलों ॥९२॥
जरी मी करितों हरीचें स्मरण । तरी काम बापुडें बाधी कोण ।
मज माझी असती आठवण । तैं तुच्छ जाण उर्वशी ॥९३॥
किमेतया नोऽपकृतं, रज्ज्वा वा सर्पचेतसः ।
रज्जुस्वरुपाविदुषो, योऽहं यदजितेन्द्रियः ॥१७॥
मूढमतीचा प्रबोध । मानी उर्वशीचा अपराध ।
विवेकें पाहतां शुद्ध । मीच मतिमंद सकाम ॥९४॥
उर्वशी देखतां दृष्टीं । मी कामासक्त झालों पोटीं ।
माझिये लंपटतेसाठीं । मज म्यां शेवटीं नाडिलें ॥९५॥
जेवीं सांजवेळे पडिला दोरु । भेडा सर्प भासे थोरु ।
जंव नाहीं केला निर्धारु । तंव महाअजगरु भयानक ॥९६॥
तेणें सर्पभयें लवडसवडीं । पळों जातां पैं तांतडी ।
दुपावुलीं पडली आढी । त्याची कल्पना नाडी तयासी ॥९७॥
तेवीं माझिये कामभ्रांतीं । उर्वशी सुंदर युवती ।
एथ माझिया कामासक्ति । सुरत-रतीं भुललों ॥९८॥
यापरी मी अविवेकात्मा । भुललों उर्वशीच्या कामा ।
तीवरी कोपणें जें आम्हां । हेंचि अधर्माचें मूळ ॥९९॥
दृष्टीं देखतां कामिनी । कामासक्ता ते अतिरमणी ।
विवेकिया पोहणघाणी । नरकमाथणी ते कांता ॥२००॥
जेवीं सूकरा विष्ठेची प्रीती । तेवीं सकामा कामिनीची रती ।
विवेकी देखोनि थुंकिती । तेंचि श्लोकार्थीं नृप बोले ॥१॥
क्वायं मलीमसः कायो, दौर्गन्ध्याद्यात्मकोऽशुचिः ।
क्व गुणाः सौमनस्याद्या, ह्मध्यासोऽविद्यया कृतः ॥१८॥
स्त्री-पुरुष नामाभिधान । केवळ देहासीचि जाण ।
ते स्त्रीदेहीं पाहतां गुण । मलिनपणा अत्यंत ॥२॥
जे नीच नव्या विटाळाची खाणी । जे रजस्वलेची प्रवाहन्हाणी ।
जे कां दुर्गंधाची पोहणी । जे उतली चिडाणी विष्ठेची ॥३॥
जे कां दोषांचें जन्मस्थान । जे विकल्पाचें आयतन ।
जे महादुःखाचें भाजन । अधःपतन जिचेनी ॥४॥
जे वाढवी अतिउद्वेग । जिचेनी मनासी लागे क्षयरोग ।
जिचा बाधक अंगसंग । अतिनिलाग निंद्यत्वें ॥५॥
जेवीं नीचाचा कांठपरा । गळां अडकल्या मांजरा ।
तें रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रां विटाळी ॥६॥
तेवीं कामिनीची संगती । गळां पडली न निघे मागुती ।
कामिनीकामें कामासक्तीं । नेणों किती विटंबिले ॥७॥
तें मांजर जेथें घाली मुख । तेथ कांठपरा रोधी देख ।
तेवीं स्त्रीसंगें अतिदुःख । मानिती सुख सकाम ॥८॥
मृगजळीं कमळ मनोहर । तैसें अंगनावदन सुंदर ।
सुस्मित चारु सुकुमार । सकाम नर वानिती ॥९॥
अंगनावदनाची निजस्थिती । निखळ शेंबुडाची तेथ वस्ती ।
तें मुख चंद्रेसीं उपमिती । जेवीं अमृत म्हणती विखातें ॥२१०॥
वनिताअधरीं झरे लाळ । ते म्हणती अधरामृत केवळ ।
बाप अविद्येचें बळ । भुलले सकळ सुरासुर ॥११॥
स्त्रीपुरुषीं आत्मा एक । स्त्रीरुप तेथ आविद्यक ।
मिथ्या स्त्रीकामीं भुलले लोक । बाप कवतिक मायेचें ॥१२॥
आत्मा भोक्ता म्हणावा स्त्रीसंभोगीं । तंव तो नित्यमुक्त असंगी ।
देह भोक्ता म्हणावा स्त्रीसंयोगीं । तंव देहाचे अंगीं जडत्व ॥१३॥
तेथ विषयभोगासी कारण । मुख्यत्वें देहाभिमान ।
त्या देहाभिमानासी जाण । बहुत जण विभागी ॥१४॥
पित्रोः किं स्वं नु भार्यायाः स्वामिनोऽग्नेः श्वगृध्रयोः ।
किमात्मनः किं सुहृदामिति यो नावसीयते ॥१९॥
गर्भधारण पोषण । स्वयें श्रमोनियां आपण ।
माता करी परिपालन । तो हा देह जाण ’मातेचा’ ॥१५॥
एकलेपणें माता । स्वप्नीं न देखे पुत्रकथा ।
जो निजवीर्यनिक्षेपिता । तो हा देहो तत्त्वतां ’पित्याचा’ ॥१६॥
जे अग्नि ब्राह्मण साक्षी करुनी । भार्या आणिली भाक देवोनी ।
जे जीवित्व समर्पोनी । सेवेलागोनी विनटली ॥१७॥
जीसी याचेनि सुखशृंगार । जीसी याचेनि ऐहिक पर ।
ऐसा सूक्ष्म करितां विचार । देहो साचार ’स्त्रियेचा’ ॥१८॥
या देहाचीं आवश्यकें । ’सुहृद बंधू’ जे कां सखे ।
देहाचेनि सुखावती सुखें । देह एके पाखें त्यांचाही ॥१९॥
स्वयें घेऊनियां वेतन । देहो विकिला आपण ।
आज्ञेवीण न वचे क्षण । देहो जाण ’स्वामीचा’ ॥२२०॥
’श्वानशृगालगिधांचें’ खाजें । तरी हा देहो त्यांचा म्हणिजे ।
जीवस्तव देहीं कर्म निफजे । यालागीं देह बोलिजे ’जीवाचा’ ॥२१॥
पिता-माता-स्त्री-पुत्र-स्वजन । देहाचें अवश्य करिती दहन ।
यालागीं देह ’अग्नीचा’ पूर्ण । विचक्षण बोलती ॥२२॥
यापरी देहाचे जाण । विभागी असती आठ जण ।
तेथ ’मी भोक्ता’ हा अभिमान । तो केवळ जाण मूर्खत्वें ॥२३॥
एथ एक ’मी’ विशिष्ट भोक्ता । ’माझा’ देह ऐशी ममता ।
हेचि जाण तत्त्वतां । अधःपाता नेताती ॥२४॥
तस्मिन्कलेवरेऽमेध्ये, तुच्छनिष्ठे विषज्जते ।
अहो सुभद्रं सुनसं, सुस्मितं च मुखं स्त्रियः ॥२०॥
देहो तितुका अशुचिकर । त्यांत स्त्रीदेह अतिअपवित्र ।
केवळ विटाळाचें पात्र । निरंतर द्रवरुपें ॥२५॥
स्वयें भोक्ता अतिकुश्चित । ऐसे अविवेकी कामासक्त ।
कामिनीकामीं लोलंगत । ते मूर्ख वानीत स्त्रियांतें ॥२६॥
अहो हे सुंदर सुरेख । चंद्रवदना अतिसुमुख ।
सरळ शोभे नासिक । सुभग देख सुकुमार ॥२७॥
ऐशिये सुंदर स्त्रियेतें । पावलों आम्ही सभाग्य एथें ।
ऐशीं कामासक्तचितें । भुललीं भ्रांतें प्रमदांसी ॥२८॥
स्त्रीदेहाचे विवंचनें । विवंचितां ओकारा ये मनें ।
जळो स्त्रियेचें निंद्य जिणें । मूर्खीं रमणें ते ठायीं ॥२९॥
त्वङ्मांसरुधिरस्नायुमेदोमज्जाऽस्थिसंहतौ ।
विण्मूत्रपूये रमतां, कृमीणां कियदन्तरम् ॥२१॥
स्त्रीदेहाचा उभारा । केवळ अस्थींचा पांजरा ।
त्याचें आवरण तें स्नायु शिरा । बांधोनि खरा दृढ केला ॥२३०॥
तेथ रुधिरमांसाचें कालवण । करुनि पांजरा लिंपिला पूर्ण ।
अस्थीवरील जें वेष्टण । ’मज्जा’ म्हणती त्या नांव ॥३१॥
अस्थिमाजील रसबद्ध । त्या नांव बोलिजे ’मेद’ ।
वरी चर्म मढिलें सुबद्ध । ’त्वचा’ शुद्ध ती नांव ॥३२॥
त्या देहामाजीं सांठवण । विष्ठा मूत्र परिपूर्ण ।
ते स्त्रीदेहीं ज्याचें रमण । ते ’कृमि’ जाण नररुपें ॥३३॥
विष्ठेमाजीं कृमि चरती । तैशी स्त्रीदेहीं ज्यां आसक्ती ।
तेही कृमिप्राय निश्चितीं । संदेह ये अर्थी असेना ॥३४॥
वनिता देह यापरी एथ । विचारितां अतिकुश्चित ।
तो वस्त्रालंकारीं शोभित । करुनि आसक्त नर होती ॥३५॥
घंटापारधी पाश पसरी । त्यावरी तो मृगांतें धरी ।
पुरुश स्त्रियेतें श्रृंगारी । त्या पाशाभीतरीं स्वयें अडके ॥३६॥
यालागीं स्त्रियांची संगति । कदा न करावी विरक्तीं ।
गृहस्थीं सांडावी आसक्ती । येचि अर्थीं नृप बोले ॥३७॥
अथापि नोपसज्जेत, स्त्रीषु स्त्रैणेषु चार्थवित् ।
विषयेन्द्रियसंयोगान्मनः क्षुभ्यति नान्यथा ॥२२॥
स्त्रीदेह शोभनीय असता । तरी वस्त्रालंकारेंवीण शोभता ।
तो अतिनिंद्य कुश्चितता । उघडा सर्वथा शोभेना ॥३८॥
यालागीं वस्त्राभरणीं । देह गुंडिती कामिनी ।
जेवीं मैंद ब्राह्मणपणीं । विश्वासूनी घात कीजे ॥३९॥
तैशी स्त्रियांची संगती । सेवा लावी नाना युक्तीं ।
शेखीं संगें पाडी अधःपातीं । तेथ विरक्तीं न वचावें ॥२४०॥
जरी स्त्रियेची विरक्तस्थिती । तरी साधकीं न करावी संगती ।
अग्निसंगें घृतें द्रवती । तेवीं विकारे वृत्ति स्त्रीसंगें ॥४१॥
अमृत म्हणोनि खातां विख । अवश्य मरण आणी देख ।
स्त्री मानूनि सात्त्विक । सेवितां दुःख भोगवी ॥४२॥
अग्नीमाजीं घृताची वस्ती । जरी बहुकाळ निर्वाहती ।
तरी स्त्रीसंगें परमार्थी । निजात्मस्थिती पावते ॥४३॥
घृत वेंचल्या वर्षें झालीं साठी । तरी अग्निसंगें द्रव उपजे घटीं ।
तेवीं प्रमदासंग परिपाठीं । वार्धकींही उठी अतिकामु ॥४४॥
जरी कापूर अग्नीआंत । नांदों लाहता न पोळत ।
तरीच स्त्रीसंगें परमार्थ । पावते समस्त परब्रह्म ॥४५॥
अग्नी पोळी धरितां हातीं । तैशी स्त्रियांची संगती ।
संगें वाढवी आसक्ती । पाडी अनर्थीं पुरुषांतें ॥४६॥
स्त्रियेपरीसही स्त्रैण । संगती मीनलिया जाण ।
कोटि अनर्थांचें भाजन । अधःपतन तत्संगें ॥४७॥
स्त्रैणेंसीं झाल्या भेटी । ब्रह्मानंद स्त्रीसुखाच्या पोटीं ।
ऐशा विरक्तां प्रबोधी गोठी । करी उठाउठी स्त्रीकाम ॥४८॥
तेथ स्वदारा आणि परदारा । या करुं नेदी विचारा ।
प्रवर्तवी स्वेच्छाचारा । स्त्रैण खरा अतिघाती ॥४९॥
स्त्रैण जेथें प्रवेशला । तेथ अनाचार वेलीं गेला ।
अधर्म सर्वांगीं फुलला । बाधकत्वें फळला अनर्थफळीं ॥२५०॥
यालागीं जो परमार्थी । तेणें स्त्री आणि स्त्रैणाची संगती ।
सर्वथा न धरावी हातीं । पाडी अनर्थी तो संग ॥५१॥
मुख्य स्त्रैणचि वाळिला आहे । तेथें स्त्रीसंग कोठें राहे ।
हे संगतीचि पाहें । सेव्य नोहे परमार्था ॥५२॥
यालागीं साधकीं आपण । स्त्रीनिरीक्षण संभाषण ।
सर्वथा न करावें जाण । एकांतशील न केव्हांही व्हावें ॥५३॥
म्हणशी विवेकी जो आहे । त्यासी स्त्रीसंग करील काये ।
स्त्रीसंगास्तव पाहें । सोशिले अपाये सुज्ञांनीं ॥५४॥
पराशरासी अर्ध घडी । नावेसी मीनली नावाडी ।
ते अर्ध घटिकेसाठीं रोकडी । अंगीं परवडी वाजली ॥५५॥
ऋष्यश्रृंग अतितापसी । तोही वश झाला वेश्येसी ।
इतरांची गोठी कायसी । मुख्य महादेवासी भुलविलें ॥५६॥
विषय इंद्रियांचे संगतीं । अवश्य क्षोभे चित्तवृत्ती ।
तेथ सज्ञानही बाधिजती । मा कोण गती अज्ञाना ॥५७॥
हेही असो उपपत्ती । नसतां स्त्रियांची संगती ।
काम क्षोभे एकांतीं । तेंचि विशदार्थी नृप बोले ॥५८॥
अदृष्टादश्रुताद्गावान्न भाव उपजायते ।
असंप्रयुञ्जतः प्राणान्, शाम्यति स्तिमितं मनः ॥२३॥
जें देखिलें ऐकिलें नाहीं । ऐशिया विषयांचे ठायीं ।
पुरुषाचें मन पाहीं । सर्वथा कहीं क्षोभेना ॥५९॥
जे पूर्वभुक्त विषय असती । तेचि स्मरण झालिया चित्तीं ।
कामउद्रेकें क्षोभे वृत्ती । नसतां संगती स्त्रियेची ॥२६०॥
एवं पूर्वापार विषयासक्ती । पुरुषासी बाधक निश्चितीं ।
तो बैसल्याही एकांतीं । वासनासंस्कारें वृत्ति सकाम क्षोभे ॥६१॥
पूर्वदिवशींचीं पक्वान्नें । जीं ठेविलीं अतियत्नें ।
तीं न करितांही रांधणें । पहांटे भक्षणें स्वयें जेवीं ॥६२॥
तेवीं वासनासंस्थित काम । पुरुषास करी सकाम ।
कामक्षोभें पाडी भ्रम । कर्माकर्म स्मरेना ॥६३॥
एवं वासना कामसंगती । बाधक होय परमार्थीं ।
यालागीं साधकीं समस्तीं । स्त्रीकामासक्ती त्यागावी ॥६४॥
मनीं क्षोभल्या कामसक्ती । साधकीं तेथें करावी युक्ती ।
आवाराव्या बाह्य इंद्रियवृत्ती । तैं मनासी शांति हळूहळू होय ॥६५॥
कर्मेंद्रियीं राखण । दृढ वैराग्य ठेविलिया जाण ।
मनीं क्षोभल्या काम पूर्ण । आपल्या आपण उपशमे ॥६६॥
जेणें पडिजे अनर्थी । ते त्यागावी संगती ।
संगत्यागाची निजस्थिती । दृढ श्लोकार्थीं नृप बोले ॥६७॥
तस्मात्सङगो न कर्तव्यः, स्त्रीषु स्त्रैणेषु चेन्द्रियैः ।
विदुषां चाप्यविश्रब्धः, षङ्वर्गः किमु मादृशाम् ॥२४॥
जेणें सज्ञाना उठी छळ । सकाम भुलवी तत्काळ ।
ऐसा स्त्रीसंग अनर्थशीळ । त्याहूनि प्रबळ स्त्रैणाचा ॥६८॥
यालागीं कर्मेंद्रियांचे स्थितीं । स्त्री आणि स्त्रैणाची संगती ।
घडों नेदावी परमार्थीं । जे निजस्वार्थीं साधक ॥६९॥
जरी विषयीं क्षोभेल मन । तरी इंद्रियें आवरावीं आपण ।
तरी मनींचा विषयो जाण । मनींचि आपण स्वयें विरे ॥२७०॥
निकट विषय स्त्रीसंगती । मन क्षोभे विषयासक्तीं ।
क्षणार्ध स्त्रीसंगप्राप्ती । पडले अनर्थी सज्ञान ॥७१॥
स्त्रीदर्शनें कामासक्त । देवेंद्र झाला भगांकित ।
चंद्र कळंकिया एथ । केला निश्चित गुरुपत्न्याक ॥७२॥
सौभरी तपस्वी तपयुक्त । तो मत्स्यमैथुनास्तव एथ ।
करुनि सांडिला कामासक्त । ऐसा संग अनर्थभूत स्त्रियांचा ॥७३॥
निजकन्येचिया संगतीं । ब्रह्मा भुलला कामासक्ती ।
मा इतरांची कोण गती । संग अनर्थी स्त्रियांचा ॥७४॥
कामिनीसंग अतिदारुण । शिवासी झालें लिंगपतन ।
प्रमदांसंगें सज्ञान । ठकले जाण महायोगी ॥७५॥
नारदें विनोददृष्टीं । कृष्णपत्नीह मागितल्यासाठीं ।
तो नारदी केला गंगातटीं । तेथ जन्मले पोटीं साठी पुत्र ॥७६॥
कौतुकें स्त्रियांप्रति जातां । सज्ञान पावे बाधकता ।
मा मजसारिख्या मूर्खाची कथा । कोण वार्ता ते ठायीं ॥७७॥
क्षणार्ध स्त्रियांची संगती । सज्ञान ठकले ऐशा रीतीं ।
जे स्त्रीसंगा विश्वासती । ते दुःखी होती मजऐसे ॥७८॥
यालागीं विश्वासतां स्त्रीसंगासी । इंद्रियषङ्वर्ग ठकी सर्वांसी ।
एथ आवरुनि इंद्रियांसी । सर्वथा स्त्रियांसी त्यागावें ॥७९॥
त्यागूनि स्त्रियांची संगती । उपरमूनि इंद्रियवृत्ती ।
राजा पावला परम शांती । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥२८०॥
तस्मात्सङगो न कर्तव्यः, स्त्रीषु स्त्रैणेषु चेन्द्रियैः ।
विदुषां चाप्यविश्रब्धः, षङ्वर्गः किमु मादृशाम् ॥२४॥
जेणें सज्ञाना उठी छळ । सकाम भुलवी तत्काळ ।
ऐसा स्त्रीसंग अनर्थशीळ । त्याहूनि प्रबळ स्त्रैणाचा ॥६८॥
यालागीं कर्मेंद्रियांचे स्थितीं । स्त्री आणि स्त्रैणाची संगती ।
घडों नेदावी परमार्थीं । जे निजस्वार्थीं साधक ॥६९॥
जरी विषयीं क्षोभेल मन । तरी इंद्रियें आवरावीं आपण ।
तरी मनींचा विषयो जाण । मनींचि आपण स्वयें विरे ॥२७०॥
निकट विषय स्त्रीसंगती । मन क्षोभे विषयासक्तीं ।
क्षणार्ध स्त्रीसंगप्राप्ती । पडले अनर्थी सज्ञान ॥७१॥
स्त्रीदर्शनें कामासक्त । देवेंद्र झाला भगांकित ।
चंद्र कळंकिया एथ । केला निश्चित गुरुपत्न्याक ॥७२॥
सौभरी तपस्वी तपयुक्त । तो मत्स्यमैथुनास्तव एथ ।
करुनि सांडिला कामासक्त । ऐसा संग अनर्थभूत स्त्रियांचा ॥७३॥
निजकन्येचिया संगतीं । ब्रह्मा भुलला कामासक्ती ।
मा इतरांची कोण गती । संग अनर्थी स्त्रियांचा ॥७४॥
कामिनीसंग अतिदारुण । शिवासी झालें लिंगपतन ।
प्रमदांसंगें सज्ञान । ठकले जाण महायोगी ॥७५॥
नारदें विनोददृष्टीं । कृष्णपत्नीज मागितल्यासाठीं ।
तो नारदी केला गंगातटीं । तेथ जन्मले पोटीं साठी पुत्र ॥७६॥
कौतुकें स्त्रियांप्रति जातां । सज्ञान पावे बाधकता ।
मा मजसारिख्या मूर्खाची कथा । कोण वार्ता ते ठायीं ॥७७॥
क्षणार्ध स्त्रियांची संगती । सज्ञान ठकले ऐशा रीतीं ।
जे स्त्रीसंगा विश्वासती । ते दुःखी होती मजऐसे ॥७८॥
यालागीं विश्वासतां स्त्रीसंगासी । इंद्रियषङ्वर्ग ठकी सर्वांसी ।
एथ आवरुनि इंद्रियांसी । सर्वथा स्त्रियांसी त्यागावें ॥७९॥
त्यागूनि स्त्रियांची संगती । उपरमूनि इंद्रियवृत्ती ।
राजा पावला परम शांती । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥२८०॥
श्रीभगवानुवाच -
एवं प्रगायन्नृपदेवदेवः, स उर्वशीलोकमथो विहाय ।
आत्मानमात्मन्यवगम्य मां वै, उपारमज्ज्ञानविधूतमोहः ॥२५॥
जो उर्वशीस्वर्गभोग पावोनी । ज्यासी देव मानिती श्रेष्ठपणीं ।
जो सकाळराजचूडामणी । ज्यासी येती लोटांगणीं भूपाळ ॥८१॥
ऐसा पुरुखा चक्रवर्ती । लाहोनि उर्वशीभोगप्राप्ती ।
स्वर्गभोगीं पावला विरक्ती । सभाग्य नृपति तो एक ॥८२॥
अप्राप्तविषयें योगी । बहुत देखिले विरागी ।
परी प्राप्तस्वर्गांगनाभोगीं । धन्य विरागी पुरुखा ॥८३॥
पुरुख्याऐशी विरक्ती । नाहीं देखिली आणिकांप्रती ।
धन्य पुरुखा त्रिजगतीं । स्वमुखें श्रीपति वाखाणी ॥८४॥
तेणें अनुतापाच्या अनुवृत्तीं । निंदोनियां निजात्मस्थिती ।
क्षाळिली कामिनीकामासक्ती । धुतला निश्चितीं महामोहो ॥८५॥
अनुतापआगिठीं अभंग । वैराग्यपुट देऊनि चांग ।
विवेकें दमितां साङग । काममोहाचे डाग क्षाळिले तेणें ॥८६॥
जेवीं सोनें पुटीं पडे । तुक तुटे वानीं चढे ।
तेवीं निजात्मप्राप्तिनिवाडें । वृत्ति वाडेंकोडें क्षाळिली ॥८७॥
ऐशिये अतिशुद्ध निजवृत्तीं । विवेकवैराग्यसंपत्ती ।
पूर्ण अनुतापाचे स्थितीं । माझी कृपाप्राप्ती पावला ॥८८॥
माझिया कृपेवीण कांहीं । कदा अनुताप नुपजे देहीं ।
शुद्ध अनुताप ज्याच्या ठायीं । ते माझी कृपा पाहीं परिपूर्ण ॥८९॥
माझी कृपा झालिया जाण । जीव होय ब्रह्म पूर्ण ।
निःशेष गळे देहाभिमान । मीतूंपण भासेना ॥२९०॥
तेथ कार्य कर्म आणि कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता ।
दृश्य दर्शन द्रष्टृता । हे त्रिपुटी सर्वथा असेना ॥९१॥
त्रिगुणत्रिपुटीचें कारण। मूळभूत निजअज्ञान ।
तें सद्गुरुकृपेस्तव जाण । गेलें हरपोन मिथ्यात्वें ॥९२॥
जेवीं दोराचें सापपण । निर्धारितां हारपे पूर्ण ।
तेवीं गुणेंसीं अविद्या जाण । जाय हारपोन गुरुबोधें ॥९३॥
सद्गुरुबोधें पाहतां जाण । दिसेना द्वैताचें भान ।
तेथ उर्वशी भोगी कोण । राजा स्वानंदें पूर्ण निवाला ॥९४॥
राजा निवाला ब्रह्मरसीं । मग सांडूनियां उर्वशी ।
त्यजोनियां स्वर्गलोकासी । निजबोधेंसीं निघाला ॥९५॥
इतर ज्ञाते स्त्रिया त्यागिती । परी त्यागेना कामासक्ती ।
तैसी नव्हे रायाची स्थिती । परमार्थविरक्ती पावला ॥९६॥
जे परम विरक्तीचे पोटीं । कामिनी कामवार्ता नुठी ।
ब्रह्मानंदें कोंदली सृष्टी । स्वानंदपुष्टीं निवाला ॥९७॥
ऐसा सुखरुपें सहज । मी होऊनि पावला मज ।
जिणोनि कल्पना कामकाज । नाचत भोज स्वानंदें ॥९८॥
ऐसा निश्चयेंसीं निश्चित । माझें निजस्वरुप झाला प्राप्त ।
तेणें हा इतिहास एथ। निजसुखार्थ गायिला ॥९९॥
अनुताप आवडीं इतिहास । गातां प्रकटे पूर्ण परेश ।
तेथ सहजें अविद्येचा नाश । निजसुखें क्षितीश निवाला ॥३००॥
एवढी पावावया निजप्राप्ती । त्यागावी कामिनीकामासक्ती ।
मुख्यत्वें धरावी सत्संगती । हेंचि उद्धवाप्रती हरि बोले ॥१॥
ततो दुःसङगमुत्सृज्य, सत्सु सज्जेत बुद्धिमान् ।
सन्त एतस्य छिन्दन्ति, मनोव्यासङगमुक्तिभिः ॥२६॥
अवश्य त्यागावी दुःसंगता । तो दुःसंग कोण म्हणशी आतां ।
तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसंग सर्वथा असेना ॥२॥
जो मानीना वेदशास्त्रार्था । जो अविश्वासी परमार्था ।
ज्यामाजीं अतिविकल्पता । तोही तत्त्वतां दुःसंग ॥३॥
जो बोल बोले अतिविरक्त । हृदयीं अधर्मकामरत ।
कामरोधें द्वेषा येत । तोही निश्चित दुःसंग ॥४॥
कां स्वधर्मकर्मविनीतता । बाह्य दावी सात्विकता ।
हृदयीं दोषदर्शी संतां । हे दुःसंगता अतिदुष्ट ॥५॥
जो मुखें न बोले आपण । परी देखे साधूंचे दोषगुण ।
तेंचि संवादिया दावी उपलक्षण । तो अतिकठिण दुःसंग ॥६॥
मुख्य आपली जे सकामता । तोचि दुःसंग सर्वथा ।
तो काम समूळ त्यागितां । दुःसंगता त्यागिली ॥७॥
कामकल्पनेचा जो मार । तोचि दुःसंग दुर्धर ।
ते कामकल्पना त्यागी जो नर । त्यासी संसार सुखरुप ॥८॥
कामकल्पना त्यागावया जाण । मुख्य सत्संगचि कारण ।
संतांचे वंदितां श्रीचरण । कल्पनाकाम जाण उपमर्दे ॥९॥
संग सर्वथा बाधक । म्हणशी त्यजावा निःशेख ।
तरी सत्संग न धरितां देख । केवीं साधक सुटतील ॥३१०॥
सत्संगेंवीण जें साधन । तेंचि साधकां दृढ बंधन ।
सत्संगेंवीण त्याग जाण । तेंचि संपूर्ण पाषांड ॥११॥
चित्तविषयांचा संबंध । गांठीं बैसल्या सुबद्ध ।
त्यांचा करावया छेद । विवेकें विशद निजसाधु ॥१२॥
संतांच्या सहज गोठी । त्याचि उपदेशांच्या कोटी ।
देहात्मता जीवगांठी । बोलासाठीं छेदिती ॥१३॥
भावें धरिल्या सत्संगती । साधकां भवापाशनिर्मुक्ती ।
यालागीं अवश्य बुद्धिमंतीं । करावी संगती संतांची ॥१४॥
त्या संतलक्षणांची स्थिती । अतिसाक्षेपें श्रीपती ।
आदरें सांगे उद्धवाप्रती । यथानिगुती निजबोधें ॥१५॥
सन्तोऽनपेक्षा मच्चित्ताः, प्रशान्ताः समदर्शिनः ।
निर्ममा निरहङकारा, निर्द्वन्द्वा निष्परिग्रहाः ॥२७॥
साधूंचे अमित गुण । त्यांत मुख्यत्वें अष्टलक्षण ।
निवडूनि सांगे श्रीकृष्ण । ते कोण कोण अवधारीं ॥१६॥
प्राप्ताप्राप्त-लाभावस्था । बाधूं न शके साधूंच्या चित्ता ।
चित्त रातलें भगवंता । ’निरपेक्षता’ या नांव ॥१७॥
पैल विषयो मज व्हावा । ऐसा आठव नाठवे जीवा ।
हा साधूचा निरपेक्ष ठेवा । जाण उद्धवा गुण पहिला ॥१८॥
चित्तें चिंतावें चैतन्य । याचि नांवें ’मचित्त’ पण ।
याचि नांवें निरपेक्ष पूर्ण । इतर चिंतन भवबंधु ॥१९॥
निरपेक्ष व्हावया एथ । जागृति स्वप्नसुषुप्तीआंत ।
चिन्मात्रीं जडलें चित्त । या नांव ’मच्चित्त’ गुण दुजा ॥३२०॥
देह झालिया लक्ष्मीयुक्त । अथवा हो कां आपद्भूत ।
चित्त परमानंदीं निश्चित । या नांव ’मच्चित्त’ उद्धवा ॥२१॥
कामलोभादिदोषरहित । परमानंदीं जडलें चित्त ।
शांति सुखवासें वसे तेथ । यालागीं ’प्रशांत’ बोलिजे त्यासी ॥२२॥
जरी प्राणान्त केला अपकार । तरी न म्हणे हा ’दुष्ट’ नर ।
अपकार्याण करी अतिउपकार । प्रशांतिप्रकार या नांव ॥२३॥
जरी ठकूनि सर्वस्व नेलें । तरी क्षोभेना दोष बोले ।
तें जाण ब्रह्मार्पण झालें । येणें अंगा आलें प्रशांतत्व ॥२४॥
ब्रह्मभावेंचि ऐसा हा प्रशांत गुण । अंगीं बाणावया हेंचि कारण ।
जगीं देखे ’समदर्शन’ । ब्रह्मपरिपूर्ण समसाम्यें ॥२६॥
जग पाहतां दिसे विषम । परी विषमीं देखे सम ब्रह्म ।
तोचि ’समदर्शी’ परम। हा गुण निरुपम पैं चौथा ॥२७॥
हे समदृष्टी यावया हाता । भावें भजोनि भगवंता ।
निःशेष त्यजावी अहंममता । तेही कथा अवधारीं ॥२८॥
देहीं धरितां देहाभिमान । ते अहंता वाढवी ’मीपण’ ।
मीपणें ’ममता’ जाण । वाढे संपूर्ण देहसंबंधें ॥२९॥
जे वाढली अहंममता । ते वर्तवी महादुःखावर्ता ।
तेचि निवारावया निजव्यथा । सद्भावें गुरुनाथा शरण जावें ॥३३०॥
गुरुकृपा झालिया पूर्ण । माझ्या देहींचें जें मीपण ।
तें उकलोनि दावितां जाण । जग संपूर्ण मी एक ॥३१॥
जें जें सान थोर दिसे दृष्टीं । तें तें अवघें मीचि सृष्टीं ।
माझ्या मीपणाची निजपुष्टी । घोंटीत उठी त्रैलोक्य ॥३२॥
ऐसा मीपणें परिपूर्ण । तेथ ’मी’ म्हणावया म्हणतें कोण ।
निःशेष निमालें मीतूंपण । ’निरभिमान’ या नांव ॥३३॥
ऐसें माझें मीपण पाहतां । समूळ हारपली ममता ।
हें ’माझें’ म्हणावया पुरता । ठाव रिता नुरेचि ॥३४॥
माझ्या मीपणाबाहिरें । जैं ममतास्पद दुजें उरे ।
तैं तेथ पूर्ण ममता स्फुरे । ते म्यां चिन्मात्रें घोंटिली ॥३५॥
तेथ मीपणेंसीं मी माझें । नुरेचि तूंपणेंसीं तुझें ।
ऐसे परब्रह्माचेनि निजें । झाले सहजें ’निर्मम’ ॥३६॥
निर्मम निरभिमान । तें हें उद्धवा गा संपूर्ण ।
पांचवें सहावें लक्षण । संतांचें जाण निजगुह्य ॥३७॥
ऐसे निर्मम निरहंकार । जे होऊनि ठेले साचार ।
त्यांसी द्वंद्वदुःखडोंगर । अणुमात्र न बाधी ॥३८॥
देह अदृष्टाच्या वांटा । लागतां सुखदुःखांच्या झटा ।
तो ब्रह्मसुखाचे चोहटा । देहाचा द्रष्टा होऊनि वसे ॥३९॥
देहासी पदवी आली थोरी । तो श्लाघेना जीवाभीतरीं ।
देह घोळसितां नरकद्वारीं । तो अणुभरी कुंथेना ॥३४०॥
देह व्याघ्रमुखीं सांपडे । तेणें दुःखें तो न सांकडे ।
देह पालखीमाजीं चढे । तैं वाडेंकोडें श्लाघेना ॥४१॥
छाया विष्ठेवरी पडे । कां पालखीमाजीं चढे ।
तेणें पुरुषा सुखदुःख न जोडे । मुक्तासी तेणें पाडें देहभोग ॥४२॥
त्याचे दृष्टीखालीं एकाएक । दुःखपणा मुके दुःख ।
सुखपणा विसरे सुख । ’निर्द्वंद’ देख या हेतू ॥४३॥
जो निर्मम निरभिमान । त्यासी नाहीं भेदमान ।
अभेदीं मिथ्या द्वंद्वबंधन । हा सातवा गुण निर्द्वंद ॥४४॥
जो निर्द्वंद्व निरभिमान पहा हो । त्यासी समूळ मिथ्या निजदेहो ।
तेथ देहसंबंधे परिग्रहो । उरावया ठावो मग कैंचा ॥४५॥
स्वजनधनस्त्रीपुत्रांसी । नांदोनि तो नातळे त्यांसी ।
स्वप्नींची घरवात जागृता जैशी । तैसा साधूसी संसारु ॥४६॥
एवं परिग्रही असोन । साधु ’अपरिग्रही’ पूर्ण ।
हें आठवें मुख्य लक्षण । अतर्क्य जाण जगासी ॥४७॥
साधु परिग्रही दिसती । परी ते परिग्रही नसती ।
हेचि संतांची पावावया स्थिती । त्यांची निजभक्ती करावी ॥४८॥
हें साधूचें अष्टलक्षण । तें ब्रह्मींचें अष्टांग जाण ।
कीं अष्टमहासिद्धि निर्गुण । ते हे अष्टगुण साधूंचे ॥४९॥
चैतन्यसरोवरींचें कमळ । विकासलें अष्टदळ ।
तें हें संतलक्षण केवळ । स्वानंदशीळ साधूंचें ॥३५०॥
ऐसे हे अष्ट महागुण । सकळ भूषणां भूषण ।
ज्यांचे अंगीं बाणले पूर्ण । ते साधु सज्जन अतिशुद्ध ॥५१॥
इतर संगाचिये प्राप्ती । संग बाधक निश्चितीं ।
तैशी नव्हे सत्संगती । संगें छेदी आसक्ती देहसंगा ॥५२॥
तेथ उपदेश नलगे कांहीं । संगेंचि देही करी विदेही ।
तेचि साते श्लोकीं पाहीं । संतांची नवाई हरि सांगे ॥५३॥
तेषु नित्यं महाभाग, महाभागेषु मत्कथाः ।
संभवन्ति हिता नृणां, जुषतां प्रपुनन्त्यघम् ॥२८॥
इंद्रपदादि ब्रह्मसदन । ये प्राप्ती नांव ’भाग्य’ गहन ।
तेही सत्संगासमान । कोट्यंशें जाण तुकेना ॥५४॥
ऐशी जे कां सत्संगती । सभाग्य भाग्याचे पावती ।
भगवद्भावें साधु वर्तती । माझे कथाकीर्ति-अनुवादें ॥५५॥
जे कथा अवचटें कानीं । पडतां कलिमलाची धुणी ।
करुनि सांडीत तत्क्षणीं । जे गंगेहूनी पवित्र ॥५६॥
जेथ माझी निजकथा गाती । तीर्थें तेथें पवित्र होती ।
ऐशिया भगवत्कथाकीर्ती । साधु गर्जती सर्वदा ॥५७॥
स्वयें आपण भागीरथी । सर्वदा ऐसें जीवीं चिंती ।
कोणी साधु ये जैं मजप्रती । तैं माझीं पापें जाती निःशेष ॥५८॥
पार्वतीचा द्वेष मनीं । तें बद्धपाप मजलागुनी ।
तेंही झडे संतचरणीं । सकळ पापा धुणी सत्संगें ॥५९॥
कां ज्याचे मुखीं हरिनामकीर्ती । त्याचे पाय जैं मजमाजीं येती ।
तैं सकळ पापें माझीं जाती । ऐसें भागीरथी स्वयें बोले ॥३६०॥
ऐसी संतांची संगती । सदा वांछी भागीरथी ।
अवचटें गेलिया संतांप्रती । पापें पळतीं प्राण्यांचीं ॥६१॥
ते संतमुखींची माझी कथा । जैं अत्यादरें ऐके श्रोता ।
तैं त्याचें निजभाग्य तत्त्वतां । मजही सर्वथा न वर्णवे ॥६२॥
माझे कथेची अतिआवडी । नित्य नूतन नवी गोडी ।
सादरें ऐकतां पापकोडी । जाळोनि राखोडी उरवीना ॥६३॥
माझी कथा कां माझें नाम । सकळ पातकां करी भस्म ।
हेंचि चित्तशुद्धीचें वर्म । अतिसुगम उद्धवा ॥६४॥
नाना योग याग वेदाध्ययन । करितां पवित्र नव्हे मन ।
तें करितां हरिकथाश्रवण । होय अंतःकरण पुनीत ॥६५॥
अबद्ध पढतां वेद । दोष बाधिती सुबद्ध ।
नाम पढतां अबद्ध । श्रोते होती शुद्ध परमार्थतां ॥६६॥
नाना योग याग वेदाध्ययन । तेथ अधिकारी द्विज संपूर्ण ।
कथाश्रवणें चारी वर्ण । होती पावन उद्धवा ॥६७॥
ऐसा लाभ कथाश्रवणीं । तरी कां नाइकिजे सकळ जनीं ।
तें भाग्य भगवत्कृंपेवांचूनी । सर्वथा कोणी लाहेना ॥६८॥
भगवत्कृपा पावेल साङग । त्यांसी कथाकीर्तनीं अनुराग ।
तेचि निजभाग्यें महाभाग । स्वमुखें श्रीरंग बोलिला ॥६९॥
जगातें पवित्र करिती । माझी जाण नामकीर्ती ।
ऐसा कळवळोनि श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥३७०॥
ऐशी भगत्कृपेची प्राप्ती । केवीं आतुडे आपुले हातीं ।
तेचि अर्थीं श्रीपती । विशद श्लोकार्थी सांगत ॥७१॥
ता ये श्रृण्वन्ति गायन्ति, ह्यमुमोदन्ति चादृताः ।
मत्पराः श्रद्दधानाश्च, भक्तिं विन्दन्ति ते मयि ॥२९॥
आपुलिया गृहकार्यार्था । विषयव्यापारीं जातां जातां ।
कानीं पडली हरिकथा । स्वभावतां प्रसंगें ॥७२॥
कृष्णकीर्तिकथनाक्षरें । रिघतांचि कर्णद्वारें ।
भीतरील पाप एकसरें । निघे बाहिरें गजबजोनि ॥७३॥
जेवीं पंचाननाची आरोळी । करी मदगजां रांगोळी ।
तेवीं हरिकथेच्या मेळीं । होय रंवदळी महापापा ॥७४॥
ऐसा निघाल्या पापाचा केरु । कथेसी उपजे अत्यादरु ।
कथावधानीं धरितां धीरु । हर्षें निर्भरु नर होय ॥७५॥
जंव जंव कथारहस्य जोडे । तंव तंव अनुमोदनीं प्रीति वाढे ।
वाढले प्रीतीचेनि पाडें । ते कथ कैवाडें स्वयें गाय ॥७६॥
फेडूनि लोकलाजेचें बिरडें । गातां हरिकीर्तिगुण पवाडे ।
न पाहे तो कर्माकडे । न सांकडें सुहृदासी ॥७७॥
निजभावें भगवत्कथा गातां । स्वयंभ उपजे सादरता ।
तेणें अत्यादरें हरिकथा । होय सांगता अतिश्रद्धा ॥७८॥
जंव जंव कथा सांगे निवाडें । तंव तंव श्रद्धा अधिक वाढे ।
प्रेमाचा पूर चढे । त्यामाजीं बुडे निजश्रद्धा ॥७९॥
कथाकीर्तन अनुकीर्ती । वाढत्या श्रद्धेचिये प्रीतीं ।
बाधूं न शके विषयासक्ती । तेणें मत्पर स्थिति साधकां ॥३८०॥
न करितां भगवद्भजन । वेदाध्ययन यज्ञ दान ।
येणेंचि आम्ही जाऊं तरोन । म्हणती ते जन महामूढ ॥८१॥
एथ मुख्यत्वें भगवद्भक्ती । हा विश्वास धरितां चित्तीं ।
भगवत्पर झालिया वृत्ती । सर्व भूतीं मद्भाव ॥८२॥
ऐसा भाव धरोनि हृदयीं । माझे भक्तीवेगळें कांहीं ।
सर्वथा स्वयें करणें नाहीं । ’मत्पर’ पाहीं या रीतीं ॥८३॥
ऐशिया मत्परा वृत्तीं । सावधान निजस्थिती ।
तेणें उपजे ’चौथी भक्ती’ । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥८४॥
तेथ न करितां आठवण । अखंड होय हरीचें स्मरण ।
क्रियामात्रें भगवद्भजन । सहजें जाण सर्वदा ॥८५॥
जें जें ’दृष्टीं’ देख आपण । थोर अथवा सूक्ष्म सान ।
तें तें होय हरीचें निजदर्शन । सहजें भजन अहेतुक ॥८६॥
जें जें ’वाचा’ वदे वचन । तें तें होय हरीचें स्तवन ।
स्तव्य स्तविता उणखून । हेही आठवण विसरोनी ॥८७॥
शब्दीं शब्दातें शब्दवितां । ते शब्दरुपें हरीची सत्ता ।
शब्द द्योती ज्या शब्दार्था । ते अर्थग्राहकता हरीची ॥८८॥
यापरी ’शब्दश्रवण’ । श्रवणीं श्रवण होतां जाण ।
तो शब्दार्थ संपूर्ण । होय ब्रह्मार्पण श्रवणेंसीं ॥८९॥
’गंध’ घ्राणां होतां भेटी । भोक्तेपणें हरीचि उठी ।
तो घ्रेय घ्राता घ्राण त्रिपुटी । स्वयें घोंटी चिदत्वें॥३९०॥
’रस’ रसना रसत्वबोध । तेथ निजभोक्ता गोविंद ।
तो भोग्य भोक्ता भोजनसंबंध । करी परमानंद निजबोधें ॥९१॥
’शीत-उष्ण-मृदु-कठीण’ । निजांगीं लागतां जाण ।
तें अंगेंचि होय आपण । मृदु कठिण मिथ्यात्वें ॥९२॥
’करां’ची जे कर्तव्यता । तीतें चालवी अकर्तता ।
यालागीं घेतां देतां । अकर्तात्मतां हरिभजन ॥९३॥
निश्चल निजरुपावरी । चपळ पाउलांच्या हारी ।
चालवी जैशा लहरी । सूर्यकरीं मृगजळाच्या ॥९४॥
जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । चिन्मात्रीं जडली वृत्ती ।
चित्त चित्तत्वाची विसरे स्फूर्ति । या नांव ’मद्भक्ति’ उद्धवा ॥९५॥
हे माझी आवडती भक्ती । इचें नांव म्हणिजेत ’चौथी’ ।
हें भाग्य आतुडे ज्याचे हातीं । तैं चारी मुक्ती निजदासी ॥९६॥
भक्तिं लब्धवतः साधोः, किमन्यदवशिष्यते ।
मय्यनन्तगुणे ब्रह्मण्यानन्दानुभवात्मनि ॥३०॥
अत्यंत माझी पढियंती । ते हे जाण चौथी भक्ती ।
निजभाग्यें लाधल्या हातीं । चारी मुक्ती तृणप्राय ॥९७॥
निरपेक्ष जेथ माझी भक्ती । तेथ पायां लागती चारी मुक्ती ।
त्यांतें भक्त न धरिती हातीं । एथवरी प्रीति मद्भजनीं ॥९८॥
माझिया निजभजनप्रीतीं । स्वप्नींही बद्धता नेणिजे भक्तीं ।
बद्धतेवीण मिथ्या मुक्ती । जाणोनि न घेती निजभक्त ॥९९॥
जेथ बद्धता समूळ कुडी । तेथ मुक्ति कायशी बापुडी ।
माझिया निजभजनआवडीं । स्वानंदकोडी मद्भक्तां ॥४००॥
निरपेक्ष निजप्रीतीं । भावें करितां अनन्य भक्ती ।
भक्तांसी स्वानंदाचि प्राप्ती । भजनस्थितीमाझारीं ॥१॥
जेवीं गर्भेंसीं वर्ते गुर्विणी । कां तरुणपणेंसीं तरुणी ।
तेवीं स्वानंदाच्या पूर्णपणीं । माझे निजभजनीं मद्भक्त ॥२॥
तेथ सगुण अथवा निर्गुण । उभयरुपें मीचि ब्रह्म पूर्ण ।
तेथ भावें करितां भजन । ब्रह्मसंपन्न मद्भक्त ॥३॥
भावें करितां माझी भक्ती । भाविकां कोण पां अप्राप्ती ।
विवेक वैरग्यज्ञान संपत्ती । पायां लागती मद्भक्तांच्या ॥४॥
माझे निजभजनें तुटे भेद । स्वयेंचि प्रकटे अभेदबोध ।
तेणें वोसंडे परमानंद । स्वानंदकंद स्वयंभ ॥५॥
माझे स्वरुपा नाहीं अंत । यालागीं नांवें मी ’अनंत’ ।
बाप भक्तभाव समर्थ। तिहीं मी अनंत आकळिलों ॥६॥
ऐसें ज्यांचें प्रेम गोड । त्यांचे सेवेचें मज कोड ।
त्यांचें सोशीं मी सांकड । निचाडा चाड मज त्यांची ॥७॥
देव सप्रेमें भुलला । म्हणे मी त्यांचाचि अंकिला ।
जीवेंभावें त्यांसी विकिला । मी त्यांचा जाहला तिहीं लोकीं ॥८॥
एथवरी भक्तां माजी प्राप्ती । अवचटें झाल्या सत्संगती ।
मा सद्भावें जे साधु सेविती । त्यांची निजगती मज न बोलवे ॥९॥
ऐसा संतमहिमा वानितां । धणी न पुरे श्रीकृष्णनाथा ।
तोचि संतमहिमा मागुता । होय वानिता चौं श्लोकीं ॥४१०॥
यथोपश्रयमाणस्य, भगवन्तं विभावसुम् ।
शीतं भयं तमोऽप्येति, साधून् संसेवतस्तथा ॥३१॥
जेवीं वैश्वानर तेजोमूर्ती । त्याची सेवा जे करुं जाणती।
त्यांचें शीततमभयनिवृत्ती । तो करी निश्चितीं उद्धवा ॥११॥
शीत निवारी संनिधी । तम निवारी तेजोवृद्धी ।
भय निवारी भगवद्बुद्धी । जेवीं त्रिशुद्धी विभावसु ॥१२॥
तैशीच जाण सत्संगती । संगें त्रिविध ताप निवारती ।
तेचि अर्थींची निजयुक्ती । ऐक उपपत्ती उद्धवा ॥१३॥
शीत म्हणिजे द्वंद्वबाधु । तो समूळ निवारिती साधु ।
तम म्हणिजे अज्ञानांधु । त्यासी करिती प्रबोधु निजज्ञानें ॥१४॥
भयांमाजीं श्रेष्ठ मरण । भय निवारी साधु विचक्षण ।
निवारिती जन्ममरण । कृपाळु पूर्ण दीनांचे ॥१५॥
अग्नीसमान म्हणों साधु । हाही बोल अतिअबुद्ध ।
अग्नीहूनि अधिक साधु । तोचि प्रबोधु हरि सांगे ॥१६॥
अग्नीपाशीं प्रबळ धूम । साधु निष्क्रोध निर्धूम ।
अग्नि पोळी अधमोत्तम । साधू सर्वसम सुखदाते ॥१७॥
साधूंची धन्य संगती । संगें जडजाडय तोडिती ।
कर्माचें कर्मत्व मोडिती । बुडत्या तारिती निजसंगें ॥१८॥
निमज्ज्योन्मज्जतां घोरे, भवाब्धौ परमायनम् ।
सन्तो ब्रह्मविदः शान्ता, नौर्दृढेवाप्सु मज्जताम् ॥३२॥
प्रतिक्षणीं अधिक वृद्धी । अमर्याद वाढे भवाब्धी ।
तेथ उबकल्या चुबकल्या त्रिशुद्धी । अधर्मबुद्धि जनासी ॥१९॥
अधर्में निमज्जन नरकांत । स्वधर्में उन्मज्जन स्वर्गांत ।
ऐसे भोगिती आवर्त । स्वर्गनरकांत संसारी ॥४२०॥
यापरी संसारी जन । पावतां उन्मज्जन निमज्जन ।
त्यासी तरावया भवाब्धि जाण । साधु सज्जन दृढ नाव ॥२१॥
पडल्या जळार्णवा माझारीं । जेवीं अच्छिद्र नाव तारी ।
तेवीं बुडतां भवसागरीं । सुखरुप तारी सज्जननाव ॥२२॥
कामक्रोधरहित शांती । हेचि नावेची अच्छिद्र स्थिती ।
ब्रह्मज्ञानें सपुरती । सुखरुप निश्चितीं या हेतु ॥२३॥
कामक्रोधादि सावजांसी । बळें घ्यावया आंविसासी ।
कदा न येववे नावेपाशीं । संगें सकळांसी तारक ॥२४॥
नवल ये नावेची स्थिती । जुनी नव्हे कल्पांतीं ।
बुडवूं नेणे धारावर्ती । तारक निश्चितीं निजसंगें ॥२५॥
परी ये नावेची नवल गती । वरी चढले ते बुडती ।
तळीं राहिए ते तरती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥
दीनांचा कळवळा पहा हो । हाचि मुख्यत्वें तरणोपावो ।
त्या कळवळ्याचा अभिप्रावो । स्वयें देवो सांगत ॥२७॥
अन्नं हि प्राणिनां प्राण, आर्तानां शरणं त्वहम् ।
धर्मो वित्तं नृणां प्रेत्य, सन्तोऽर्वाग्बिभ्यतोऽरणम् ॥३३॥
जेवीं अन्नेवीण प्राण । सर्वथा न वांचती जाण ।
प्राण्यांचें प्राणपोषण । करावया सामर्थ्य पूर्ण अन्नीं नांदे ॥२८॥
जोडली धर्माची संपत्ती । ते इहलोकीं होय रक्षिती ।
तेचि धर्मधन देहांतीं । उत्तम गतिदायक ॥२९॥
संसारीं । पीडिले दारुण । त्रिविध तापें तापले पूर्ण ।
ऐशिया शरणागता शरण्य । मी नारायण रक्षिता ॥४३०॥
माझें करितां नामस्मरण । सहजें निवारे जन्ममरण ।
त्या मज रिघालिया शरण । बाधी दुःख कोण बापुडें ॥३१॥
दुःखभय न पावतां आधीं । जिंहीं साधु सेविले सद्बुद्धीं ।
त्यांसी भवभयाची आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी बाधीना ॥३२॥
प्राणियांसी होतां पतन । भाग्यें भेटल्या सज्जन ।
निवारुनि अधोगमन । जन्ममरण छेदिती ॥३३॥
संसार तरावया जाण । सत्संगतीचि प्रमाण ।
त्यांचे भावें धरितां चरण । दीनोद्धरण त्यांचेनी ॥३४॥
सन्तो दिशन्ति चक्षूंषि, बहिरर्कः समुत्थितः ।
देवता बान्धवाः सन्तः, सन्त आत्माऽहमेव च ॥३४॥
जेवीं आंधारेंसीं सगळी राती । निजतेजें निरसी गभस्ती ।
तेवीं सत्संगसूर्यप्राप्तीं । अविद्येची निश्चितीं निरसी निशा ॥३५॥
बाह्य उगवल्या गभस्ती । चोरभयाची होय निवृत्ती ।
तेवीं जोडल्या सत्संगती । भवभय कल्पांतीं असेना ॥३६॥
बाह्य सूर्योदयकाळीं । पक्षी सांडिती आविसाळीं ।
सत्संगसूर्याचे मेळीं । देहाचीं आविसाळीं सांडिती जीव ॥३७॥
बाह्य सूर्याच्या किरणीं । हर्षें विकासे कमळिणी ।
सत्संगसूर्याचे मिळणीं । निर्विकल्प कमळणी विकासे ॥३८॥
सूर्य उगवलिया गगनीं । चक्रवाकें मिळती मिळणीं ।
तेवीं सत्संग पावोनि । जीव शिव दोनी एकवटती ॥३९॥
बाह्य सूर्याचे पहांटेसी । पांथिक चालती स्वग्रामासी ।
सत्संगसूर्याचे प्रकाशीं । मुमुक्षु निजधामासी पावती ॥४४०॥
बाह्य सुर्याचे उदयस्थितीं । कर्माची चाले कर्मगती ।
सत्संग सूर्याचे संगतीं । निष्कर्म प्रवृत्ति प्रवर्ते ॥४१॥
सूर्यबिंबाचे उदयसंधीं । अर्घ्यदान दीजे वेदविदीं ।
सत्संगसुर्याचे संबंधीं । दीजे देहबुद्धी तिलांजळी ॥४२॥
सूर्यउदयाचिया प्राप्ती । याज्ञिक होमातें हविती ।
तेवीं सत्संगसूर्यस्थिती । अहंता हविती ज्ञानाग्नीं ॥४३॥
सूर्य उगवूनि आकाशीं । जगाची जड निद्रा निरसी ।
संत उगवूनि चिदाकाशीं । जीव चित्प्रकाशीं प्रबोधी ॥४४॥
हो कां साधु सूर्यासमान । हें बोलणें निलाग हीन ।
सूर्यो पावे अस्तमान । साधु प्रकाशमान सर्वदा ॥४५॥
सूर्यासी आच्छादी आभाळ । साधु सदा निजनिर्मळ ।
सूर्यासी सदा भ्रमणकाळ । साधु अचंचळ भ्रमणरहित ॥४६॥
ग्रहणकाळाचा लवलाहो । पावतां सूर्यातें ग्रासी राहो ।
साधु ग्रहांचा पुसोनि ठावो । स्वानंदें पहा हो नांदती ॥४७॥
धुई दाटतां प्रबळ । तेणें आच्छादे रविमंडळ ।
तम धूम मोहपडळ । साधूंसी अळुमाळ बाधीना ॥४८॥
सूर्य निजकिरणें सर्वांतें तावी । साधु निजांगें जग निववी ।
सूर्य सर्वांतें क्षयो दावी । साधु अक्षयी करी निजबोधें ॥४९॥
सूर्यो साह्य झालिया दृष्टीं । दृश्याकारें उघडे सृष्टी ।
सत्संग साह्य झालिया दृष्टीं । चिन्मात्रें सृष्टी ठसावे ॥४५०॥
विवेकें विचारितां देख । सूर्याहूनि साधु अधिक ।
साधु धरातळीं ज्ञानार्क । भवाब्धितारक निजसंगियां ॥५१॥
पृथ्वीतळीं देवता साधु । साधु दीनांचे सखे बंधु ।
साधुरुपें मी परमानंदु । जाण प्रसिद्धु परमात्मा ॥५२॥
देवां दीजे बळिअवदान । तेव्हां देव होती प्रसन्न ।
कृपातारक निजसज्जन । दयाळु पूर्ण दीनांचे ॥५३॥
सुहृद सखे सगोत्र बंधु । द्रव्यलोभें भजनसंबंधु ।
निर्लोंभें कृपाळू साधु । सखे बंधु दीनांचे ॥५४॥
संत केवळ कृपेचे दीप । संत ते माझें निजस्वरुप ।
यालागीं सत्संगें फिटे पाप । होती निष्पाप साधक ॥५५॥
निष्पाप करुनि साधकांसी । ब्रह्मस्वरुपता देती त्यांसी ।
ऐसें कृपाळुत्व साधूंपाशीं । जाण निश्चयेंसीं उद्धवा ॥५६॥
मी निर्गुणत्वें ब्रह्म पूर्ण । साधु चालतें बोलतें ब्रह्म जाण ।
साधूंसी रिघालिया शरण । तैं जन्ममरण असेना ॥५७॥
साधूंसी सद्भावें शरण । रिघाल्या नुरे जन्ममरण ।
साधु शरनागतां शरण्य । सत्य जाण उद्धवा ॥५८॥
भावें धरिलिया सत्संगती । संसारिया होय निर्मुक्ती ।
हें प्रतिज्ञापूर्वक श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥५९॥
सद्भावेंसीं सत्संगती । धरितां घरा ये ब्रह्मस्थिती ।
हें निजवर्म उद्धवाप्रती । देवें अध्यायांतीं निरुपिलें ॥४६०॥
परम विरक्तीचें कारण । तें हें पुरुखाप्रकरण ।
उपसंहार श्रीकृष्ण । अध्यायांतीं जाण संपवी ॥६१॥
वैतसेनस्ततोऽप्येवमुर्वश्या लोकनिस्पृहः ।
मुक्तसङगो महीमेतामात्मारामश्चचार ह ॥३५॥